अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्या नर्स सोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून, तिला धमकी देऊन मारहाण केल्याची घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडली. या प्रकरणी पीडित नर्सने दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश जगदीप सगळगिळे (रा. कोठी, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी शहराच्या मध्यवर्ती भागात एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. योगेश हा त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवायचा तसेच माझ्यासोबत बोल असे कायम म्हणायचा. याबाबत त्यांनी पतीला सांगितले होते. फिर्यादीला शनिवारी रात्री ड्यूटी असल्याने त्या हॉस्पिटलमध्ये होत्या.
योगेश हा रात्री दोन वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या गेटवर गेला व फिर्यादीला ‘तू माझ्या बरोबर चल, मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे, तू जर बाहेर आली नाहीस तर तुला मारून टाकीन’ असे म्हणून तिला मारहाण करून तिचा हात धरून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी तेथे आल्याने तो तेथून पळून गेला. दरम्यान, घडलेला प्रकार पीडिताने तिच्या पतीला सांगितला व सोमवारी सायंकाळी या प्रकरणी फिर्याद दिली. पोलीस अंमलदार कवाष्टे अधिक तपास करत आहेत.