नाशिक । प्रतिनिधी Nashik
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलाॅन व चायनीज मांजा(Nylon Manja) पशुपक्षांसह मीनवी जिवितास धाेकादायक आहे. हा मांजा कुणीही वापरु नये अथवा विक्री करु नये. नाशिककरांनी मांजाविराेधी चळवळीत पाेलिसांना साथ दिली तर हे कृत्रिम संकट आपण लवकरात लवकर थाेपवू असे आवाहन पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दैनिक ‘देशदूत’शी बाेलतांना केले आहे.
मकरसंक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी होत असून शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे. ती वाढल्यावर नायलॉन व तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली आहे. त्यानुसार विविध पाेलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकांनी केलेल्या धडक कारवाईत ३४ गुन्हे दाखल करुन ३९ जणांना अटक केली आहे. तर मांजा खरेदी व विक्रीसह ताे वापरात आणणाऱ्या जवळपास ७५ संशयितांवर तडिपारीची कारवाई केली आहे. त्यामुळे कधीही हा मांजा वापरु नये किंवा खरेदी करु नये. तसे केल्यास पर्यावरण संरक्षण (Environmental protection)अधिनियमासह भादवि कलम व तडिपारीची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे कर्णिक यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, हा मांजा विक्री करणाऱ्यांसह त्याची खरेदी करणाऱ्यांची माहिती शहर पाेलिसांना द्यावी, संबंधिताचे नाव गाेपनीय ठेऊन संशयितांवर कारवाई केली जाईल, असे शेवटी त्यांनी स्पष्ट केले.