येवला | प्रतिनिधी Yeola
संक्रांत पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चोपदार वस्ती येथे छापा घालून तब्बल 104 चकरी नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असून शहरातील चोपदार वस्ती भागात चोरीछुपे पद्धतीने नायलॉन मांजा विकला जात असल्याची माहिती पोलीस हवालदार बोडके आणि वाघमोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचे नेतृत्वाखाली कोर्टा जवळील चोपदार वस्ती येथील एका शेडवर पोलीस व नगरपरिषद पथकाने छापा कारवाई केली. छाप्यात 104 चकरी नायलॉन मांजा मिळून आला. सदर मांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अझर सलीम शेख उर्फ चोपदार यास ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, शहर परिसरात नायलॉन मांजा विक्री वा वापर करणाऱ्यांवर प्रचलित कायद्याने कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक भवारी यांनी सांगितले आहे.




