अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळील एका गाळ्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक लाख 20 हजार रुपये किंमतीच्या नायलॉन चायना मांजाच्या 240 रिळ जप्त केल्या आहेत. रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दर्शन दिनेश परदेशी (वय 26 रा. सातभाई गल्ली, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरात सर्रास नायलॉन चायना मांजाची विक्री होत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, विश्वास बेरड, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, रवींद्र घुंगासे, उमाकांत गावडे यांचे पथक अहिल्यानगर शहरात नायलॉन चायना मांजाच्या विक्री बाबत माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ एका पत्र्याच्या गाळ्यात मांजाची विक्री होत आहे. पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री केली असता दर्शन परदेशी हा नायलॉन चायना मांजा विक्री करत असताना मिळून आला.
त्याच्या ताब्यातून एक लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 240 रिळ जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस 223, 125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शासनाने बंदी घातलेला बेकायदेशीर नायलॉन चायना मांजाची विक्रेत्यांनी विक्री व साठवणूक करू नये, बंदी असलेला मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी देखील मांजा खरेदी करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.
विक्रेत्यांना मनपाच्या नोटिसा
शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने नायलॉन मांजा विक्री न करण्याबाबत, कायद्याचे पालन करण्याबाबत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तोफखाना, बागडपट्टी यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी पतंग व मांजा विक्री होते, तेथे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून 25 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. कारवाईसाठी पथके सज्ज असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.