Tuesday, July 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली; काय झाले निर्णय वाचा सविस्तर

ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली; काय झाले निर्णय वाचा सविस्तर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

खोट्या कुणबी दाखल्यांच्या तसेच इतर मुद्द्यांवरून वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर सहयाद्री अतिथीगृह येथे आज उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, अतुल सावे, उदय सामंत, गिरीश महाजन, धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, वडीगोद्री-जालना आदी भागांतील ओबीसी समाजाचे नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित होते. यात छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित होते.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तसेच सगेसोयरेंना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. त्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी हे सर्व दाखले आधार कार्डाशी जोडण्यात येतील. तसेच मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जशी मंत्र्यांची समिती आहे तशीच समिती ओबीसी-भटक्या समाजासाठीही तयार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी येथे दिली.

तसेच खोटे कुणबी दाखले देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार असून अशी प्रकरणे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आजच्या बैठकीत सरकारने दिले आहे. मी तसेच माझ्यासोबत सात ते आठ मंत्र्यांचे शिष्टमंडळ शनिवारी वडीगोद्री येथे जाऊन प्रा. लक्ष्मण हाके यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, जातीनिहाय जनगणनेच्या आमच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाठिंबा दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.कायद्याला देखील ते मान्य होणार नाही असे आश्वासन आम्हाला सरकारतर्फे देण्यात आले आहे. जातीची खोटी प्रमाणपत्रे कोणालाही दिली जाणार नाहीत. खोटे कुणबी दाखले दिले असतील तर ते तपासण्यात येतील. खोटी प्रमाणपत्रे देणारे आणि घेणारे हे दोघेही गुन्हेगार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. काही जण अनेक वेळा वेगवेगळे दाखले काढून फायदे घ्यायला बघतात. ओबीसी, ईडब्ल्यूएस,एसईबीसी असे सगळयातून फायदे घेतात. हे सर्व दाखले आधार कार्डाला जोडण्याचे काम करण्यात येईल. जेणेकरून एक व्यक्ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल. सगेसोयरेमध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रमाणपत्र कसे द्यावे, जातपडताळणी कशी करावी यासंदर्भात पूर्ण माहिती असणारे एक पुस्तकच आहे. त्याप्रमाणे सगळयाची पूर्तता करून प्रमाणपत्र देण्यात येते. अधिवेशन काळात सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन सगेसोयरेबाबत काय करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. सगेसोयरेंचा प्रश्न सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊनच सोडविण्यात येईल. मराठा समाजावर तसेच ओबीसी, भटक्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

वडीगोद्रीला मंत्र्यांचे शिष्टमंडळ जाणार
आजच्या बैठकीत जे निर्णय झाले आहेत त्याची माहिती शनिवारी आपण वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाकेंना देणार आहोत. माझ्यासोबत सात ते आठ मंत्र्यांचे शिष्टमंडळ असणार आहे. लक्ष्मण हाकेंनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांना करू. तसेच अधिवेशन काळात जी बैठक होणार आहे त्या बैठकीला हाकेंनी उपस्थित रहावे, अशी विनंती त्यांना आम्ही करू असेही भुजबळ म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपण छगन भुजबळ यांचे राजकीय जीवन उदध्वस्त करू असा इशारा दिला आहे. त्यावर कोणाचेही राजकीय जीवन ही जनता उदध्वस्त करू शकते, कोणा एका-दुस-या माणसाचे ते काम नाही. आमच्या सोबत जनतेचा भरपूर आशीर्वाद आहे, असे भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या