जालना | Jalana
राज्यात विधान सभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. जस जशी निवडणुक जवळ येत आहे तस तसे आरोप प्रत्यारोपांना धार चढत आहे. अशातच राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये. मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहे. तर ओबीसी आरक्षण वाचावे यासाठी आंदोलन करत असलेले लक्ष्मण हाके यांनी आता मनोज जरांगेंना जशास तसे उत्तर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तर ओबीसी आंदोलकांनी वडीगोद्री येथे आंदोलन सुरु केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उफाळून आला असून मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु असतानाच ओबीसीही आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, दुसरीकडे मंगेश ससाणे आणि आंदोलकांचे सगेसोयरे अधिसूचना रद्द करावी, कुणबी दाखल्याद्वारे होत असलेली घुसखोरी थांबवावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.
काय म्हणाले लक्ष्ण हाके?
मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत. जरांगेंना तुमच्या बिगबॉस मध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे. यापेक्षा जरांगेंची कुठेही लायकी नाही, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. जरांगेच्या बॅनरवर फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का? असा सवालही त्यांनी केला. जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात याची लाज वाटते. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
पुढे ते असे ही म्हणाले की, जरांगेच काय जरांगेचा बाप जरी आला शरद पवार जरी आला तरी ओबीसीच्या आरक्षण संपवू शकत नाही. असे म्हणत लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर खरमरीत टीका केली. तुझ्या बॅनरवर तुतारीचे चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर असे हाके म्हणाले.
दरम्यान, जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जीआर काढणार असाल तर ओबीसींचे जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. राहुल गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलतात. पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतरवाली सराटीला जाऊन आला, त्यांनी ओबीसींच्या भावना ऐकून घ्याव्यात, अशी टीका हाके यांनी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा