Friday, November 1, 2024
Homeशब्दगंध‘गांधीतीर्थ’च्या दशकातील मानदंड

‘गांधीतीर्थ’च्या दशकातील मानदंड

जळगाव येथील यशस्वी उद्योजक आणि गांधी विचारांचे प्रचारक श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांची कालातीत कल्पकता आणि अथक परिश्रम यातून उभारलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशन (जीआरएफ) तथा ‘गांधीतीर्थची दशकपूर्ती’ 25 मार्च 2022ला झाली. महात्मा गांधींचे आचार, विचार, साहित्याचे संकलन, त्याचे जतन व संवर्धन आणि विविध समाज घटकात बहुमाध्यमांद्वारे प्रसारण अशी अनेक कार्ये, उपक्रम जीआरएफच्या माध्यमातून सुरू आहेत. भवरलालजी जैन यांचा सहभाग आणि त्यांच्या समोर कार्याची सहा वर्षे आणि त्यांच्या पश्चात चार वर्षे असा दशकपूर्तीचा प्रवास झालेला आहे. या काळात संकलन, संवर्धन, प्रचार-प्रसार आणि नातीजोड अशा महत्त्वपूर्ण कार्यात जीआरएफने काही उल्लेखनीय मानदंड रोवले आहेत.

महात्मा गांधी यांच्याविषयी संपूर्ण जगभरात सर्वाधिक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध असलेले अग्रस्थानावरचे संशोधन स्थळ म्हणून जळगाव येथील ‘जीआरएफ’ म्हणजेच ‘गांधीतीर्थ’ला मान्यता मिळाली आहे. गांधीतीर्थ उभारणी कशासाठी? या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देताना भवरलालजी म्हणाले होते, ‘हिंसाचार, राजकीय हुकूमशाही, भौतिकवाद, अनैतिकता आणि खर्‍या अध्यात्माची कमतरता असलेल्या समकालीन जगात गांधीजी आणि त्यांच्या संदेशाची प्रासंगिकता अधिकाधिक महत्त्व प्राप्त करेल. या विश्वासाने दृढ होऊन मी हे स्मारक समस्त मानव समुहाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. रमणीय आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल अशा प्रसन्न वातावरणात स्थित गांधीतीर्थ विद्वानांना तसेच जिज्ञासू तरूणांना येथील ग्रंथालय, संग्रहालय आणि प्रदर्शन हे भेट देण्यास आकर्षित करेल. ही मंडळी येथे संशोधन आणि चिंतनासाठी वेळ देऊ शकतील. मला प्रामाणिकपणे आशा आहे की, गांधी आचार, विचार केवळ त्यांच्या जीवनातच नव्हे तर जागतिक परिस्थिती सुधारण्यातही योगदान देऊ शकेल.’ भवरलालजींचे हे शब्द आज अनेक अर्थाने वास्तवात उतरले आहेत. त्याची प्रचिती काही मानदंडातून समोर येत आहे.

जीआरएफसाठी सर्वाधिक मानाचा दंड म्हणजे, गांधीजींच्या कार्याविषयीची वास्तववादी नोंद असणार्‍या ‘कलेक्टेड वर्कस् ऑफ महात्मा गांधी’ या इंग्रजी भाषेतील 100 खंडाच्या मूळ पुनर्रचनेत तांत्रिक सहाय्यासाठी दिलेले योगदान. याबरोबरच याच खंडांच्या हिंदी अनुवादीत ‘संपूर्ण गांधी वाङ्मय’च्या पुनर्निर्मितीत जीआरएफचा थेट सहभाग. हा विषय थोडा सविस्तर समजून घेऊ. सन 1949-50 मध्ये गांधीजींच्या साहित्य व पत्रव्यवहारांचे संकलन सुरू झाले. सुरुवातीला भारतन कुमारप्पा आणि त्यानंतर जयरामदास दौलतराम हे संदर्भांचे मुख्य संपादक होते. सन 1958मध्ये पहिला खंड भारत सरकारच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित झाला. सुरुवातीची मंडळी फार थोडा काळ ग्रंथाचे काम करू शकली. सन 1960 पासून के. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ संपादक मंडळ स्थापन झाले. त्यांनी पुढील 30 वर्षे सलगपणे काम केले. सन 1994 अखेर एकूण 100 खंडांचे काम प्रकाशन विभागाने पूर्ण केले. गांधी तत्त्वज्ञान व विचार समजण्यासाठी जगभर या 100 खंडांचा अभ्यास केला जातो.

- Advertisement -

केंद्रातील सत्तेत बदल झाल्यानंतर सन 2004च्या सुमारास मूळ खंडातील काही आशय व त्यांचा क्रम बदलला गेला. गुजरातमधील दिनाबेन पटेल व काही गांधी अभ्यासकांनी आशयाच्या मूळ पुनर्रचनेचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी वारंवार सरकार दरबारी पत्रव्यवहार व संबंधितांशी चर्चा केली. अखेरीस आशय बदल केलेल्या खंडांच्या आवृत्ती नष्ट करून के.स्वामिनाथन यांनी संपादित केलेले मूळ खंड पुनःप्रकाशित करण्याचे ठरले. पुनःप्रकाशन करताना, मूळ ग्रंथातील शब्द न शब्द जसाच्या तसा, त्याच ओळींमध्ये, त्याच पानांवर, त्याच टाईप सेटमध्ये असावा असा आग्रह धरला गेला. हे ग्रंथ इंटरनेटवर ‘सर्चेबल मोड’मध्येही हवे होते. असे करणे हेच खूप मोठे आव्हान होते. यासाठी दिनाबेन आणि त्यांची टीम विविध तज्ज्ञ व तंत्रज्ञांना भेटून काय करावे? यासाठी तीन वर्षे पाठपुरावा करीत होत्या. गांधीतीर्थमधील अद्ययावत डिजिटायझेशन विभागाला भेट दिल्यानंतर त्यांना योग्य तो मार्ग मिळाला. मूळ खंडांमधील टाईपसेट तसाच बनविण्याचे तंत्र व त्याच्या अमंलबजावणीच्या प्रणालींचा मार्गदर्शक म्हणून वापर करण्याचे सन 2012-13मध्ये निश्चित झाले. सन 2018मध्ये या इंग्रजी 100 खंडांचे पुनःप्रकाशन दिल्लीत तेव्हाचे मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झाले. या कार्यात जीआरएफने दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हिंदी खंडांच्या पुनर्निर्मिती समितीत भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने जीआरएफला तंत्र सहाय्यासाठी महत्त्वाचे स्थान दिले. गांधीतीर्थ येथे दिनाबेन यांना मिळालेल्या मार्गदर्शनापासून त्या जीआरएफच्या शुभचिंतक म्हणून कार्य करीत आहेत. अनेक लोकांना जोडणे, नवीन साहित्य मिळवून देणे आदींबाबत त्या सतत आग्रही असतात.

जीआरएफचा दुसरा मानदंड आहे गांधीजींचे निकटचे सहकारी तसेच सन 1916 ते 1942 या काळात त्यांचे खासगी सचिव असलेल्या ‘महादेवभाई देसाई यांच्या डायर्‍या संकलनाचे. महादेवभाई यांचे पुत्र नारायणभाई देसाई यांचा भवरलालजींशी स्नेह होता. गांधी कथा आणि गांधीतीर्थ निर्मिती निमित्ताने ते जळगावला येऊन गेले. भवरलालजी करीत असलेले कार्य पाहून ते भारावले. जीआरएफमधील तंत्रशुद्धता, संरक्षण आणि जतन हे कार्य त्यांना भावले. त्यांनी स्वतःकडील अनेक साहित्य जीआरएफला दिले. हे साहित्य संकलन करण्यासाठी जीआरएफची टीम त्यांच्या वेडची या गावी गेली. तेथे त्यांच्या एका कपाटात महादेवभाईंच्या 17 मूळ व 8 झेरॉक्स स्वरूपातील डायर्‍या मिळाल्या. त्याचे फ्युमिगेशन, डिजिटायझेशन, संरक्षण व कलर रि प्रिंटींग करण्यात आले. हे काम पाहून नारायणभाईंना खूप समाधान मिळाले. त्यांनी दिल्ली स्थित नेहरू मेमोरियल म्युझियममधून उर्वरित डायर्‍या मिळवण्यासाठी जीआरएफ प्रतिनिधीला पत्र दिले. जीआरएफची टीम सर्व यंत्र सामुग्री घेऊन दिल्लीत धडकली. तेथे 13 मूळ व 7 झेरॉक्स डायर्‍या मिळाल्या. या सर्व डायर्‍यांच्या कालखंडाचे वर्गीकरण केल्यानंतर काही डायर्‍या उपलब्ध नसल्याचे लक्षात आले.

नारायणभाई देसाई यांचे पुत्र नचिकेता देसाई हे त्यावेळी जीआरएफमध्ये त्यांचे आजोबा ‘महादेवभाई देसाई एज ए जर्नालिस्ट’ या विषयावर रिसर्च करीत होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांचे एक नातेवाईक व प्रसिद्ध साहित्यिक वालजीभाई देसाई यांचे पुत्र एम.व्ही.देसाई हे या डायर्‍या संपादनाचे कार्य करीत होते. ते आता हयात नाही. पण त्यांची लायब्ररी खूप जुनी व मोठी आहे. तेथे गांधी साहित्य मिळण्याची शक्यता होती. हे कळताच नचिकेता यांना सोबत घेऊन जीआरएफची टीम पुन्हा दिल्ली वारीवर गेली. त्यांच्या बंगल्यातील तळघरात धूळखात पडलेल्या व उधी लागलेल्या लायब्ररीमधून, सफाई करीत अनेक मौल्यवान ग्रंथ व गांधींवरील साहित्य मिळाले.

त्यांच्या टेबलजवळीत एका खणामधे महादेवभाईंच्या आणखी 10 मूळ डायर्‍या व काही संपादन सुरू असलेल्या हस्तलिखितांची कागदपत्रे आढळली. ती जळगावला आणून त्याचे ही डिजिटायझेशन व संरक्षण करण्यात आले. गांधीजींच्या प्राथमिक साहित्यात महादेवभाईंच्या सर्व डायर्‍यांना अभ्यासकांमध्ये अग्रस्थान दिले जाते. सर्वात अधिक महादेवभाईंच्या डायर्‍यांचे एकत्रित कलेक्शन आज फक्त जीआरएफमधेच उपलब्ध आहे. या डायर्‍यांना चाळल्यावर एक नवीन बाब समोर आली ती म्हणजे, महादेवभाईंना त्याकाळी स्टेनोग्राफी येत होती. त्यांचे तसे लिखाण एका डायरीमध्ये आढळले. ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांसाठीसुद्धा नवीन होती.

जीआरएफसाठी तिसरा मानदंड आहे ‘कस्तुरबाची डायरी’ समोर आणण्याचा. जुना पत्रव्यवहार, हस्तलिखिते, डायर्‍या, ग्रंथ, पुस्तके मिळवायचा प्रयत्न जीआरएफचे प्रतिनिधी सतत करीत असतात. याच कार्याचा भाग म्हणून प्रतिनिधी देशात व जगात फिरतात. अशा फिरस्तीतून जीआरएफच्या प्रतिनिधीस इंदूर येथील कस्तुरबा राष्ट्रीय स्मारक येथील जुन्या कागदपत्रात ‘कस्तुरबाची डायरी’ आढळली.

ती मूळ प्रत होती. मात्र स्मारकातील प्रतिनिधींना हे नेमके काय याचा बोध नव्हता. कस्तुरबांना लिहिता वाचता येत नसे असेच अनेक जण बोलतात. ही डायरी मिळाल्यावर जीआरएफने डायरीचे सत्य पडताळणीसाठी अनेक संदर्भ, ग्रंथ तपासले. जुन्या गांधी अनुयायांशी चर्चा केल्यावर याचे काही संदर्भ जुळले. त्यानुसार तपासणी केल्यानंतर ‘कस्तुरबाची डायरी’ अधिकृत असल्याचे समोर आले. यावरून अनेक गांधी अनुयायी अभ्यासकांनाच काय पण गांधीजींच्या कुटुंबीयांनाही ही माहिती नवी होती. जीआरएफने या मूळ डायरीचे डिजिटायझेशन तर केलेच, पण ओरिजनल डायरीला संरक्षितही करून दिले. कस्तुरबांच्या याच डायरीवर गांधीजींचे पणतू तुषार गांधी हे लवकरच पुस्तक प्रकाशित करीत आहेत.

गांधीतीर्थच्या पुढील मानदंड आहे, विदेशातील गांधी विषयक प्रदर्शनांचा. जीआरएफतर्फे आतापर्यंत कझागिस्तान, इंडोनेशिया, ब्रिटन, अमेरिका, इस्त्राईल, मेक्सिको, इंटेल – सिलिकॉन व्हॅलीसोबतच भारतातही शेकडो ठिकाणी महात्मा गांधीजींवरील विविध विषयांची प्रदर्शने तयार करून दिली आहेत. न्यूजर्सी येथील भारतीय गुजराथी व्यापारी भद्रा बुटाला गांधीतीर्थ भेटीला आले. त्यांनी गांधीतीर्थ पाहिले. गांधीजींविषयी आपणही काही करावे या हेतूने त्यांनी न्यूजर्सी येथे ‘गांधी गोईंग ग्लोबल’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविले यात गांधीतीर्थचा 25,000 स्क्वेअर फुटाचा भव्य स्टॉल होता. हा स्टॉलनंतर गांधीयन सोसायटी, न्यूजर्सी यांना सोपविण्यात आला. ही संस्था ते प्रदर्शन अमेरिकेत इतरत्र भरवत असते. याशिवाय मेक्सिको येथील गांधी 150 निमित्तचे प्रदर्शन, ब्रिटनमधील यॉर्क विद्यापीठासोबत दांडीवरील प्रदर्शन, ह्युस्टन येथे लवकरच येऊ घातलेले इटरनल गांधी प्रदर्शन यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

गांधीतीर्थच्या मानदंडात काही व्यक्तीही समाविष्ट आहेत. त्यापैकी एक आहेत प्रसिद्ध इतिहासकार धर्मपाल यांच्या कन्या गिता धर्मपाल. गिता या जर्मनीतील हेडलबर्ग विद्यापीठाच्या साऊथ एशियन हिस्ट्री विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांच्या वडिलांची हस्तलिखिते, रिसर्चसाठी गोळा केलेली कागदपत्रे भारतात निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्या शिष्यांकडे होती. ती एकत्रित करण्याचे काम त्या करीत असताना सन 2011मध्ये त्या भवरलालजींच्या संपर्कात आल्या. त्यांच्या वडिलांच्या पेपर्सच्या संरक्षणाबाबत त्या खूपच चिंतातूर होत्या. जीआरएफ येथील डिजिटायझेशनद्वारे त्यांचा प्रश्न सुटला. तेव्हापासून त्या दरवर्षी सॅबेटीकल लिव्हच्या काळात गांधीतीर्थ येथे येऊन त्यांच्या वडिलांचे कार्य करीत होत्या. भवरलालजींसोबतचा सहवास, त्यांच्यासमोर गांधीतीर्थची होणारी उभारणी, तेथील विविध कार्य आदी पाहून त्यांना तेथे सेवा देण्याचा विचार त्यांनी भवरलालजींजवळ व्यक्त केला. सन 2017 पासून जीआरएफच्या संशोधन विभागाच्या त्या अधिष्ठाता म्हणून रुजूही झाल्या. ही सेवा त्या मानद स्वरुपात देत आहेत.

दुसरे उल्लेखनिय व्यक्तिमत्त्व होते पुण्यातील डॉ.गिरीश गोखले यांचे. जळगावमधील काही कामानिमित्त डॉ.गोखले भवरलालजींच्या संपर्कात आले. दोघांच्या चर्चेत गांधी व गोडसे विषय असायचा. डॉ. गोखले काहीवेळा गोडसेविषयी सहानुभूतीचा ग्रह बाळगत. भवरलालजींनी वारंवार चर्चा करून डॉ. गोखले यांना जीआरएफ येथील साहित्यातून सत्य काय आहे याचे पुरावे दिले. त्यातून गोखले यांचा दृष्टिकोन बदलला. ‘अरे, मी तर आजपर्यंत गांधीबाबत पूर्णपणे अंधारात होतो, माझ्यासारखे कित्येक जण असेच अंधारात आहेत, त्यांच्यापर्यंत गांधीतीर्थाच्या माध्यमातून गांधी विचार पसरवायला हवेत’ असे डॉ.गोखले म्हणाले.

यासाठी त्यांनी श्री.ब्रह्मे यांच्या नेतृत्वात दूरदर्शनची टीम आणून जीआरएफवर 45 मिनिटांचा ‘मेकिंंग ऑफ गांधीतीर्थ’ हा माहितीपट तयार केला. तो राष्ट्रीय प्रसारणात दाखवला गेला. तसेच त्यांनी त्यांच्या जळगाव भेटीत दरवेळी सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांना गांधी तीर्थ येथे आणले. ‘खरा गांधी काय’ ते इतरांना दाखवले. कोरोना काळात त्यांचे निधन झाले. शेवटपर्यंत ते गांधींवरील विविध विषयांचा सतत अभ्यास करीत राहिले. वेळी-अवेळी त्यांच्या मनातील प्रश्नांना घेऊन, भवरलालजींशी, गांधी तीर्थमधील सहकार्‍यांशी ते सतत चर्चा करीत असत.

असेच तिसरे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व जीआरएफशी जुळले आहे. ते आहेत 85 वर्षे वयाचे प्रोफेसर मार्क लिंडले. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसह जगातील 16-17 विद्यापीठात ‘म्युझिक, इकॉनॉमिक्स’ आणि आता ‘गांधीयन थॉट्स’ आदी विषयांवर शिकविण्याचे अविरत कार्य ते करतात. सन 2017पासून गांधी रिसर्च फाउंडेशनच्या संपर्कात ते आले. वर्षातून 3-4 महिने येथे राहून ते गांधीजींचे अर्थशास्त्र, आरोग्य आदी विषयांवर संशोधन करीत आहेत. त्यांचे ‘गांधी ऑन हेल्थ’ हे संशोधनपर पुस्तक फाउंडेशनने प्रसिद्ध केले आहे.

चौथे व्यक्तिमत्त्व आहे प्राचार्य विश्वासराव पाटील यांचे. विविध विषयांचा व्यासंग असलेल्या पाटीलसर यांनी गांधींवरील विविध साहित्य लेखनात स्वतःला वाहून घेतले आहे. गांधीजींचे संत सांगाती (दोन भाग), सत्याग्रही गांधी, समर्पित गांधी, साधक गांधी, आपले गांधी, कालजयी गांधी, हृदयाची फाळणी, खान्देशात गांधी आदी पुस्तके त्यांनी लिहीली असून फाउंडेशनने ती प्रकाशित केली आहेत. कस्तुरबांचे अधिकृत जीवनचरित्र ‘कस्तुरीगंध’ त्यांनी लिहिले आहे. या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी जीआरएफची लायब्ररी, अभिलेखागार आदींचा उपयोग घेतला.

फाउंडेशनच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक म्हणजे गांधी विचार संस्कार परीक्षा. शरीर, मन आणि आत्मा यांच्या समरसतेतून तरुण पिढीमध्ये शाश्वत जीवनमूल्ये आणि आदर्शांची बीजे पेरून त्यांना आदर्श नागरिक बनविण्यासाठी ‘गांधी विचार संस्कार परीक्षा’ (ॠतडझ) देश-विदेशातील शाळा-महाविद्यालयांमध्ये घेण्यात येते. हा उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथम सन 2007 मध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आला. शाश्वत जीवन मूल्यांचे अनौपचारिक शिक्षण देणारा हा उपक्रम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसह सर्व व्यावसायिक आणि तांत्रिक शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो.

उपक्रमाची उपयोगिता लक्षात घेता आता दरवर्षी हा उपक्रम महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा याचसोबत विदेशात सिंगापूर व जपान येथील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयोजित केला जातो. फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने ॠतडझ आयोजित करण्यासाठी विशेष परिपत्रक काढून त्याला शासन मान्यताही दिली आहे. ॠतडझच्या माध्यमातून गेल्या एक दशकाहून अधिक कालावधीत भारतातील विविध राज्यांतील आणि तीन देशांतील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे. या प्रकल्पात हजारो कैद्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

कारागृहातील अनेक कैद्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात या उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कैद्यांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल होऊन त्यांची शिक्षा कमी झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. ‘गांधी विचार संस्कार परीक्षा’ ही सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रशासनातील अधिकार्‍यांनी मांडले आहे. या माध्यमातून नैतिक मूल्यांवर आधारित समाज घडविण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या