क्रिकेट खेळाडू म्हणून इम्रान खान यांची कामगिरी चांगली होती. त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने क्रिकेटमधील विश्वचषकही जिंकला होता. तसेच कोणत्याही घराणेशाहीच्या पार्श्वभूमीतून ते राजकारणात आलेले नव्हते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. पूर्वीच्या पाकिस्तानी शासनकर्त्यांच्या तुलनेत त्यांची प्रतिमा अतिशय चांगली होती. पण आता त्यांची कोंडी झाली आहे.
पाकिस्तानातील परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. पाकिस्तानातील लष्कर सध्या याकडे तटस्थतेने पाहत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लष्कर आपली खरी चाल खेळताना दिसेल. आंतरराष्ट्रीय जगताचा विचार करता युक्रेन-रशिया संघर्षासारखे मोठे प्रश्न समोर असल्यामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात काय सावळागोंधळ सुरू आहे याकडे पाहण्यास कोणा देशाला फारसे स्वारस्य नसल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत येणार्या काळात पाकिस्तानात दोन घटकांची भूमिका महत्त्वाची राहील. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालय. पाकिस्तानच्या 342 सदस्य संख्या असणार्या नॅशनल असेम्बलीमध्ये बहुमतासाठी 172 मतांची गरज आहे. परंतु विरोधी पक्षांनी आम्हाला 174 सदस्यांचे समर्थन आहे. त्यामुळे इम्रान यांच्याकडे बहुमत नाहीये. म्हणूनच विरोधी पक्षांनी संसदेत अविश्वास दर्शक प्रस्तावावर मतदानाची मागणी केली होती. परंतु उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्याचबरोबर पाकिस्तानचे राष्ट्रपती अल्वा यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिफारशीनुसार संसद विसर्जित केली. याविरोधात विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते हे पाहावे लागेल. विरोधी पक्षांच्या बाजूने कौल दिल्यास पाकिस्तानात पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका पार पडतील.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, इम्रान खान सध्या पाकिस्तान सैन्याचे आवडते राहिलेले नाहीत. निवडणूक झाली तेव्हा पाकिस्तानी सैन्याला वाटले होते की, अन्य राजकीय पक्षांपेक्षा इम्रान खान हाताळायला अधिक सोपे असतील. त्यामुळे त्यांनी इम्रान खान यांना पाठिंबा दिला होता. इम्रान खान यांच्याकडे बहुमत नव्हते तरीही त्यांनी लहान लहान पक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यकारभार चालू केला. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक स्थिती चांगली होण्याऐवजी ती अधिकच खालावत गेली. सध्या पाकिस्तानमध्ये सामान्य माणसांचे जीवन अतिशय कष्टप्रद झाले आहे. तेथे महागाई प्रचंड वाढली आहे. पाकिस्तान केवळ कर्ज काढूनच जिवंत राहत आहे. आज पाकिस्तानला प्रतिवर्षी फेडाव्या लागणार्या कर्जाच्या मुद्दलावरील व्याज आणि त्यांच्या सैन्यावरील खर्चाचे अंदाजपत्रक यांची एकत्रित रक्कम ही त्याच्या अर्थसंकल्पाहून 5 ते 10 टक्के अधिक आहे. याचा अर्थ पाकिस्तान त्यांचे सैन्य कर्ज घेऊन वाढवत आहे. यावरून त्यांची परिस्थिती किती वाईट आहे, हे लक्षात येते. यासंदर्भात एका प्रतिनिधीने पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांना प्रश्न केला, अशा परिस्थितीत तुम्हाला भीती वाटत नाही का? यावर मजेशीर उत्तर देताना ते म्हणाले, पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट आहे यात काही संशय नाही, पण त्याची भीती आम्हाला वाटत नाही, तर संपूर्ण जगाला वाटते आणि जग हे पाकिस्तानला एक देश म्हणून उद्ध्वस्त होऊ देणार नाही.
वस्तूतः इम्रान खान यांना त्यांच्या साडेतीन वर्षांच्या कारकीर्दीमध्ये कुठलेही लक्षवेधी काम करता आले नाही. त्यांनी खेळाडू म्हणून पुष्कळ चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने क्रिकेटमधील विश्वचषक जिंकला आहे. इम्रान खान हे कोणत्याही घराणेशाहीच्या पार्श्वभूमीतून राजकारणात आलेले नव्हते. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नव्हते. उलट त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या आईच्या नावाने एक कॅन्सर रुग्णालय उभे केले होते. पूर्वीच्या पाकिस्तानी शासनकर्त्यांच्या तुलनेत त्यांची प्रतिमा अतिशय चांगली होती. त्यामुळे इम्रान खान यांच्या नेतृत्वात नवीन पाकिस्तान उभा राहून देशाची प्रगती होईल, अशी तेथील लोकांची भावना होती. पण विकासाच्या संकल्पनेमध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी, देशाची सुरक्षा सबळ व्हावी, युवकांना रोजगार मिळावा, आतंकवाद अल्प व्हावा इत्यादी गोष्टी अपेक्षित असतात. इम्रान खान यांच्या कारकीर्दीत अशा कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत. राज्यकारभार कसा करायचा, याची त्यांना जाण नव्हती. त्यांना त्यांच्या अर्थ सल्लागारांनी सांगितले की, पाकिस्तानी नागरिक कर भरत नाहीत. त्यामुळे त्यांना कर भरण्यास भाग पाडायला पाहिजे, कर वाढवायला हवा, तसेच भ्रष्टाचारही थांबला पाहिजे. इम्रान खान यांनी त्यांचे ऐकले नाही आणि कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यास तयारी दर्शवली नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अर्थतज्ज्ञ किंवा जागतिक बँक यांनी दिलेले सल्लेही इम्रान खान कृतीत आणण्यास तयार किंवा सक्षम नव्हते. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेची शक्ती कमकुवत होत गेली. पाकिस्तानी सैन्याचा खर्चही कर्ज घेऊन चालवला जातो. यावरून त्यांची स्थिती लक्षात येते.
इम्रान खान यांचे विदेशी धोरणही पूर्णपणे अयशस्वी झाले होते. आज पाश्चात्य जग आणि अमेरिका त्यांच्यावर रागवले आहेत तसेच रशियाही त्यांना सहाय्य करण्याच्या स्थितीत नाही. त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांच्या देशात विविध आंदोलने चालू होती, हिंसाचार चालू होता, त्या लोकांशीही त्यांना संवाद साधणे जमले नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आले तेव्हा इम्रान खान किंवा पाकिस्तान यांना वाटले होते की, हा त्यांचा प्रचंड मोठा विजय आहे. परंतु आजची स्थिती पाहता अफगाणिस्तान पाकिस्तानचा मित्र होण्याऐवजी शत्रू अधिक झाला आहे. तालिबानला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात असलेली ‘ड्युरंड सीमारेषा’ मान्य नाही. त्यामुळे त्या सीमेवर नेहमीच अशांतता असते.
दुसरीकडे, चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा एक पांढरा हत्ती बनला आहे. कारण त्यातून पाकिस्तानला काहीही निष्पन्न होत नाही. परंतु या महाप्रकल्पासाठी पाकिस्तानने चीनकडून अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतले असून ते त्यांना फेडावे लागणार आहे. यामुळेच पाकिस्तान चीनचा कायमचा आर्थिक गुलाम बनला आहे. या सर्वांमुळे विविध राजकीय पक्ष इम्रान खान यांंच्या विरोधात गेले आहेत.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, इम्रान खान यांनी आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाची नियुक्तीही आपणच करू, असे लष्कराला सांगितले. ही बाब लष्कराला खटकली. इम्रान खान पंतप्रधान बनले होते तेव्हा त्यांना सैन्याकडून सर्वात मोठा पाठिंबा मिळाला होता, पण आता पाकिस्तानी लष्करच विरोधात गेल्यामुळे त्यांचे भवितव्य अधांतरी बनले आहे. आज इम्रान यांच्याकडून आपल्यावर ओढवलेल्या संकटामागे परकीय शक्तींचा म्हणजे अमेरिकेचा हात आहे असे सांगितले जात आहे, पण हे आरोप अमेरिकेने फेटाळले आहेत. कारण अमेरिका आणि पाश्चात्य जगाच्या दृष्टीने पाकिस्तानचे महत्त्व फारसे उरलेले नाही. अफगाणिस्तानमध्ये दहशतशवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे होते. आता जगाने अफगाणिस्तानला वार्यावर सोडले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे महत्त्व संपुष्टात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या फायनान्शिअल टास्क फोर्स (एफएटीएफ) ने त्याला ‘ग्रे लिस्ट’मध्ये ठेवले आहे. परिणामी, विदेशी गुंतवणूकदार पाकिस्तानमध्ये यायला तयार नाहीयेत. या सर्व आर्थिक दिवाळखोरीस इम्रान खान हे पंतप्रधान म्हणून जबाबदार मानले जाणे यात गैर काहीच नाही. आज पाकिस्तानात श्रीलंकेप्रमाणेच महागाई प्रचंड वाढली आहे. अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे. थोडक्यात, एकीकडे जनतेचा रोष, दुसरीकडे लष्कराचा रोष आणि शिरजोर झालेले विरोध यामुळे इम्रान खान संकटात सापडले आहेत.