अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar
‘लालकिल्ल्यावरील तिरंगा ध्वज हटवून पाकिस्तानसारखा ध्वज फडकाविण्यासाठी एक तासाचे काम’, असा आशय दर्शविणारा आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटसला ठेवल्याप्रकरणी नगरच्या एका युवकावर कोतवाली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय सन्मानाच्या अप्रतिष्ठेस प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाचे संयोजक कुणाल सुनील भंडारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
अदनान आयाज सय्यद (वय 21 रा. कोतवाली पोलीस ठाण्याजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ इंस्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवल्याची माहिती 10 जून रोजी रात्री भंडारी यांना मिळाली होती. याबाबत कायदेशीर माहिती संकलित केली व सोमवारी कोतवाली पोलिसात धाव घेऊन हा प्रकार निदर्शनास आणला.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तातडीने याची दखल घेत सदर स्टेटस ठेवणार्या युवकास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी अदनान आयाज सय्यद याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.