नाशिक। प्रतिनिधी Nashik
पंचवटी परिसरातील जुना वाडा शुक्रवारी (दि.१८) मध्यरात्री कोसळला. वाड्याच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली वृद्धेसह एक व्यक्ती अडकला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य राबवून दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पंचवटीतील पेरीना आईस्क्रीम समोरील वाडा कोसळला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षास कळवली. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या वाड्याची पाहणी करत असताना वाड्यात दोन नागरिक अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जवानांनी बचाव कार्य राबवून वाड्यात शिरून मातीच्या ढिगाऱ्याखालून मंगला प्रकाश देवकर (६०) व त्यांचा भाचा सागर उत्तमराव सोनवणे (३७) या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
नागरिकांच्या माहितीनुसार, वाडा जीर्ण झाल्याने तेथील रहिवाशांनी वाडा सोडला होता, तर काही जण वाड्यातच राहत होते. तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या बचावकार्यामुळे दोघांचा जीव वाचवण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून धाेकेदायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समाेर आला आहे.