अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहराजवळील कापूरवाडी येथील प्रसिध्द मिरावली बाबा दर्गाह परिसरात दर्शनासाठी आलेल्या वृध्द महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि दीड हजार रूपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावना मोतीलाल ककरा (वय 64, रा. शुखवानी निकेतन, पिंपरी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भावना ककरा या रविवारी (18 जानेवारी) दुपारी दर्शनासाठी मिरावली बाबा दर्गाह परिसरात आल्या होत्या. दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ककरा यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि लॉकेट अत्यंत शिताफीने चोरले.
दागिन्यांसोबतच त्यांच्या पर्समधील दीड हजार रूपये रोख रक्कमही लंपास करण्यात आली आहे. एकूण 61 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच भावना ककरा यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. भिंगार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून भावना ककरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दिलीप झरेकर करीत आहेत.




