Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधफोर्डच्या एक्झिटच्या निमित्ताने..

फोर्डच्या एक्झिटच्या निमित्ताने..

सध्या करोनामुळे (Corona)बिकट बनलेल्या परिस्थितीत अनेक उद्योग, व्यवसाय तग धरण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच ‘मेक इन इंडिया’चे (Make in India) नारे देत परदेशी कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित केले जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना फोर्डसारख्या (Ford) जगविख्यात कार उत्पादक कंपनीने भारतातून गाशा गुंडाळण्याचा (Gasha wraps) घेतलेला निर्णय धक्कादायक ठरला. या निमित्ताने केलेली या निर्णयाशी निगडित विविध प्रश्नांची उकल.

एकीकडे ‘मेक इन इंडिया’चे नारे ऐकू येत असताना दुसरीकडे फोर्ड या अमेरिकन कार उत्पादक कंपनीने भारतातून गाशा गुंडाळल्याची घोषणा केली. एकाच आठवड्यात केंद्र सरकारने इंधन म्हणून वीज आणि हायड्रोजन वापरणार्‍या गाड्यांवर आकर्षक सवलती जाहीर केल्या. मंत्री महोदयांनी टेस्लासारखी कंपनी भारतात येणार असल्याचे सूतोवाच केले. त्याच आठवड्यात ओला कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी सुरू केली आणि त्याला भारतीय ग्राहकांनी दणकून प्रतिसाद दिला.

भारतीय ग्राहकांनी अकराशे कोटी रुपयांच्या ओला स्कूटर्स दोन दिवसात आरक्षित केल्या. म्हणजे सेकंदाला चार स्कूटर्स विकल्या गेल्या. हे सगळे एकीकडे होत असताना फोर्ड कंपनीचे भारतातून गाशा गुंडाळणे चिंताजनक आहे. म्हणूनच त्याच्याशी निगडित अनेक मुद्यांची चर्चा व्हायला हवी, प्रश्नांची उकल व्हायला हवी.

- Advertisement -

आज जगामध्ये दुचाकी निर्मितीच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर, बसनिर्मितीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर, ट्रक निर्मितीमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आणि कारनिर्मितीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. भारतात विकल्या जाणार्‍या एकूण वाहनांपैकी पंधरा टक्के वाहने चारचाकी असतात. चारचाकी विकत घेणे आजही अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.

आरामदायक चारचाकी हे मध्यमवर्गाचे स्वप्न आहे आणि ते पुढील काही काळासाठी तरी तसेच असणार आहे. म्हणून भारतात मारुतीच्या आगमनानंतर चारचाकी गाड्यांची उलाढाल प्रचंड फोफावली. दरम्यान, फोर्ड कंपनीचे भारतातले व्यवहार बंद करणे अनेकांना कोड्यात पाडणारे ठरले. ऑगस्ट महिन्यात फोर्ड कंपनीच्या गाड्या विकत घेणार्‍यांना महिन्याभरात कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार आहे, याची सूतराम कल्पना नव्हती.

या घटनेमुळे फॉर्डचे हजारो ग्राहक, अलीकडेच फोर्डच्या गाड्या विकत घेणारे, कंपनीचे सुमारे दीडशे डिलर्स आणि पाच हजार प्रत्यक्ष कामगार हवालदील झाले आहेत. चार वर्षांपूर्वी भारतातून जनरल मोटर्स या अमेरिकन कार उत्पादकाने गाशा गुंडाळला आणि आज फोर्ड कंपनीने.

मधल्या काळात हार्ले डेव्हिडसनने देखील भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फोर्ड कंपनीला गेल्या दहा वर्षांमध्ये प्रचंड आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले. परिणामी, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये कंपनीने एकही नवे मॉडेल भारतात आणले नाही. उलट, 20 वर्षे भारतात उत्पादन केल्यावर थेट गाशा गुंडाळायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता जवळपास चार हजार छोट्या उत्पादकांवर कुर्‍हाड कोसळली आहे.

लक्षात घ्या, एखाद्या मोठ्या अवजड उद्योगात एका व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा अप्रत्यक्षपणे आणखी चार रोजगार निर्माण होत असतात. आता गुजरातमधल्या साणंद आणि तमिळनाडूमधल्या फोर्डच्या मशिनरी आणि प्लांट नेमके कोण विकत घेणार, या सगळ्याचा भारतामध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्‍या अमेरिकन गुंतवणूकदारांवर नेमका काय परिणाम होणार, भारत सरकार स्वत:हून पुढे होऊन फोर्डच्या जाण्यामुळे बाधित होणार्‍या सर्व घटकांना आर्थिक आधार आणि रोजगाराचा दिलासा देऊ शकणार का, असे प्रश्न समोर आहेत.

आज तरी फोर्ड कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात यानिमित्ताने कोणतीही चर्चा झाल्याची पुष्टी दोघांकडूनही झालेली नाही. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीबरोबर सामंजस्य करार केल्यावर फोर्डला चांगले दिवस येतील अशी अटकळ होती. सुरुवातीच्या काळात तसे झालेही, पण नंतर तो करार संपुष्टात आला.

काही वर्षांनी पुन्हा करार झाला आणि पुन्हा संपुष्टात आला आणि फोर्डच्या भारतातल्या उत्पादनाला घरघर लागली; ती जीवघेणी ठरली. या सगळ्यावर खरे तर इंडस्ट्री असोसिएशनने आणि संबंधित मंत्रालयाने एकत्र येऊन एक एक्झिट रिसर्च रिपोर्ट प्रकाशित करायला हवा. एकीकडे सुझुकीसारखी जपानी कंपनी, ह्युंदाईसारखी कोरियन कंपनी, कियासारखी बहुराष्ट्रीय कंपनी भारतात यशस्वी होताना दिसते.

मग अमेरिकन कार उत्पादक का अयशस्वी ठरत आहेत, हे समोर यायला हवे. एकीकडे मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, केएफसी, बर्गर किंग भारतात यशस्वी होताना दिसत आहेत. अलीकडेच केलॉग्जचा ‘रेडी टू ईट उपमा’सुद्धा भारतीय घरात लोकप्रिय होताना दिसतो. पेप्सी, कोकाकोला हे देखील रूजलेले ब्रँड. मग अमेरिकन कार उत्पादक इथे का अयशस्वी ठरले? फोर्डकडे मस्टँगसारखे सर्व जगात लोकप्रिय असणारे मॉडेल उपलब्ध असताना भारतीय चारचाकी खरेदीदारांची मानसिकता ओळखण्यात ते कमी पडले का?

जगात इतरत्र चाललेली कार मॉडेल्स भारतात यशस्वी होतीलच असे नाही. भारतीय रस्ते, वाहन चालवण्याच्या पद्धती, पार्किंगच्या जागा अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन खास मॉडेल विकसित करावी लागतात. इथे भारतीय मानसिकता इंजिनच्या पॉवरपेक्षा गाडीचे मायलेज किती हा सवाल विचारते. इथले मार्केट गाड्यांच्या किमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे आणि ते अमेरिकन झरोक्यातून समजून घेणे शक्य नाही.

इथे तुमची किती सर्व्हिस स्टेशन्स आहेत, तुम्ही किती विश्वासार्ह आहात आणि गाडीला पुनर्विक्रीचे काय मूल्य आहे, या सगळ्याचा विचार ग्राहक चोखंदळपणे करत असतो. त्याला दुकानात गेल्यावर तत्काळ गाडीची डिलिव्हरी हवी असते. तीही स्वस्त, भरपूर मायलेज देणारी आणि घराजवळ सर्व्हिस स्टेेशन असणारी. म्हणजे थोडक्यात, अखूड शिंगी बहुदुधी असेच काहीसे झाले.

सुझुकीने सुरुवातीला मारूती सुझुकीसारखी छोटी गाडी आणून स्पर्धा नसल्याचा फायदा उठवत इथे उत्पादन-विक्री आणि दुरूस्ती यांचे साम्राज्यच उभे केले. आज भारतात विकल्या जाणार्‍या गाड्यांपैकी 60 टक्के गाड्या मारूती आणि ह्युंदाई यांच्या आहेत. आणि शेवटच्या 40 टक्क्यांमध्ये इतर सर्व उत्पादक आहेत. यावरून स्पर्धेच्या तीव्रतेची जाणीव यावी. भारतीय मानसिकता आणि त्याचा खिसा लक्षात घेता गेली अनेक वर्षे लोकांचा कल तीन ते पाच लाख रुपये किमतीच्या गाड्या विकत घेण्याकडे होता. अलीकडे, ही मानसिकता बदलताना दिसत आहे आणि सहा, साडेसहा लाखांपर्यंत गाड्या विकत घेण्याचा कल दिसून येत आहे.

याचा सर्वात जास्त फायदा भारतात सर्वात उशीरा आलेल्या कियाने बरोबर उठवला आणि स्वत:साठी एक वेगळे स्थान या स्पर्धेत निर्माण केले. मग जे कियाला जमले ते फोर्डला का जमले नाही? फोर्डची एकही गाडी पाच ते साडेपाच लाख रुपयांच्या खाली नाही. गाड्यांची निर्मिती करताना जेमतेम तीस ते चाळीस टक्के उत्पादनक्षमता वापरली गेली. त्याचा परिणाम गाड्यांच्या किमतीवरही झाला. भारतात बनवायचे आणि जगात एक्सपोर्ट करायचे हे स्वप्न मग उद्ध्वस्त झाले. खरे तर फोर्ड ही वाहन उद्योगातली एक दादा कंपनी. जगभरात तिचे साम्राज्य पसरले आहे.

चारचाकी वाहन उद्योगाचा पाया हेन्री फोर्ड यांनीच रचला. परंतु जगभरात या कंपनीला आज घरघर लागली आहे, ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी या कंपनीला चीनमध्ये यश मिळताना दिसते. वाढत जाणार्‍या भारतातच्या वाहन उद्योगक्षेत्रात जनरल मोटर्स काय आणि फोर्ड काय यांना अपयश आले. आज आपल्याकडे शिलकीत असलेल्या गाड्या फोर्ड कंपनीने भारतात स्वस्तात विकायला काढल्या आहेत. पण मारूती, किया (सेल्टॉस आणि सॉनेट), टाटा यांच्यासमोर आता त्याची विक्री देखील कठीण गोष्ट बनली आहे. त्यात भर पडली ती अलीकडच्या काळात संगणकाच्या संज्ञेवर चालणार्‍या चिपच्या अपुर्‍या पुरवठ्याची. त्यामुळे गाड्या तयार आणि चिप नाही म्हणून चालवू शकत नाही, अशा आव्हानाला सध्या सर्वजण तोंड देत आहेत.

भारतात इलेक्ट्रिक चारचाक्या दणक्यात आगमन करत आहेत. संपूर्ण वाहन उद्योगच एका प्रचंड वावटळीत सापडला आहे. तीव्र स्पर्धा, ग्राहकांची बदलती मानसिकता, किमती कमी ठेवण्याची जीवघेणी धडपड आणि इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्याकडे ग्राहकांचा बदललेला कल हे सगळे एकाच वेळी घडत आहे. जशी नवी आव्हाने उभी रहात आहेत तशा नवीन संधी देखील उभ्या राहणार.

ती संधी पटकवायची क्षमता अमेरिकन कार उत्पादकांमध्ये तूर्तास नाही, हा फोर्डच्या जाण्याचा अर्थ. सूर्य उगवत असताना त्याकडे पाठ फिरवल्याने अनेकजण सूर्योदयाचे सौंदर्य पहायला मुकतात. अनेक वावटळीतून जाणारा भारतीय उद्योग अशाच एका सूर्योदयाच्या प्रतीक्षेत आहे. तो नजीक आहे आणि तो पहायची स्पर्धा देखील तीव्र आहे. इथल्या ग्राहकाला एक क्षणही गृहित धरता येणार नाही. हाच फोर्डच्या जाण्याचा अन्वयार्थ! आपण गणपती विसर्जनावेळी ‘पुनरागमनाय च’ असे म्हणतो. हे शब्द फोर्ड साहेबांच्या लक्षात राहिले तर त्यांना भारतीय वाहन उद्योगाचा सूर्योदय पुन्हा एकदा नक्की पहायला मिळेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या