पुणे | प्रतिनिधी Pune
येरवडा कारागृहात दोन सराईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेला एक कैदी शुक्रवारी ( दि. १९) ससून रुग्णालयात मरण पावला. यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल नागनाथ कांबळे ( वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) हे हल्ल्यात मरण पावलेल्या कैद्याचे नाव आहे.
यासंदर्भात आकाश सतीश चंडालिया ( वय ३०, रा. जयजवान नगर, येरवडा ) व दीपक संजय रेड्डी ( वय २७, रा, इंद्रायणी कॉलनी, कामशेत ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे तसेच आरोपी चंडालिया व रेड्डी पोलीसदप्तरी नोंद असलेले गुन्हेगार आहेत. कांबळे एका खुनाच्या गुन्ह्यात २०१९ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच,एका खुनाच्या गुन्ह्यात चंडालिया व खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात रेड्डीही तुरुंगात आहेत. स्थानिक वर्चस्वाच्या वादातून चंडालिया व कांबळे यांच्यात वैमनस्य होते. कारागृहातही त्यांची अनेकदा भांडणे झाली होती. त्यामुळे, कांबळे याचा काटा काढण्याचा कट चंडालिया याने रचला होता. त्यासाठी तो संधीची वाट पाहत होता.
येरवडा कारागृहात सकाळी बरॅक उघडल्यानंतर कैदी बाहेर आले. मात्र, कांबळे पुन्हा आत जाऊन झोपला. त्याच्या पाळतीवर असलेल्या चंडालिया आणि रेड्डी यांनी तो झोपेतच असताना हल्ला चढवला. त्यांनी त्याच्या डोक्यात व कमरेवर अणकुचीदार फरशीच्या तुकड्याने वार केले. या प्रकारामुळे अन्य कैदी घाबरून पळाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर कारागृह रक्षकांनी तेथे धाव घेतली. कांबळे अतिशय गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना कांबळे मरण पावला. याप्रकरणी दोन्ही आरोपीना कारागृहातून अटक करण्यात आली आहे.




