सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
पुण्याहून नाशिकच्या दिशेने लोखंडी पत्रे घेऊन जाणारा आयशर टेम्पो मोहदरी घाटात रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात क्लीनर जागीच ठार झाल्याची घटना सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
आयशर टेम्पोतील पत्रे महामार्गावर पसरल्याने सुमारे तासभर वाहतुकीला खोळंबा झाला होता. सुशील कुमार रा. बिहार हा पुण्याहून नाशिकच्या दिशेने आयशर टेम्पो क्र. एम. एच. 14/ जे. एल. 1210 मध्ये लोखंडी पत्रे घेऊन जात होता. मोहदरी घाटाजवळ आयशर टेम्पो उलटल्याने टेम्पोतील पत्रे महामार्गावर पसरले गेले.
गाडीचा क्लिनर गजानन गुणवंत हुडे (24) रा. रावेरी, जि. यवतमाळ हा जागीच ठार झाला तर चालक सुशीलकुमार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर पसरलेले पत्रे हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.