Sunday, January 25, 2026
Homeक्राईमCrime News : एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Crime News : एकाच रात्री तीन दुकाने फोडली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत तीन दुकाने फोडून सुमारे 35 हजार रूपयांची रोकड लंपास केली. या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात भिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात भिंगार मधील एका किराणा दुकानातून पाच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्याचा तपास लागला नसतानाच पुन्हा चोरट्यांनी तीन दुकाने फोडली आहेत.

- Advertisement -

सचिन नानासाहेब पाटील (वय 30, रा. आलमगीर रस्ता, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या आलमगीर रस्ता परिसरातील के-मार्ट कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानाच्या काउंटरमधील 18 हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना 28 डिसेंबरच्या रात्री ते 29 डिसेंबरच्या पहाटे दरम्यान घडली. चोरट्यांनी केवळ कपड्याचे दुकानच नव्हे, तर परिसरातील अन्य दोन दुकानांनाही लक्ष्य केले. आलमगीर रिक्षा थांब्याजवळील जावेद मोहमदहनीप पठाण (रा. बिलार्ल पार्क, आलमगीर) यांचे ए. एम. ट्रेडर्स या किराणा दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील आठ हजार रूपये आणि छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सौरव संजय खर्गे यांचे एस. के. चाय स्टॉल मधून नऊ हजार रूपये चोरून नेले.

YouTube video player

एकाच रात्री तीन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या सत्रामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शेख करत आहेत.

ताज्या बातम्या