अंजली राजाध्यक्ष
चित्कूल, भारताचे शेवटचे शहर. बास्पा नदीवरील टेन्टीन्ग अॅडव्हेंचर झाल्यावर आम्ही किन्नौर जिल्ह्यातील रिकोंग पियोच्या दिशेने निघालो. वाटेत कर्छाम या ठिकाणापासून एनएच-5 सोडले की सांगला व्हॅली लागते. येथे पारंपरिक किन्नौरी पद्धतीची लाकूड कोरीव काम केलेली मंदिरे दिसतात. वेळ हाती नसल्याने आमचे ते होऊ शकले नाही.
हिमाचलमधील भारतीय बारा प्रशासकीय जिल्ह्यांपैकी एक पियो (किंवा रिकॉन्ग पियो) येथे प्रशासकीय कचेर्या दिसतात. येथे वर चढून एक बौद्ध मॉनेस्ट्री लागते. ती बंद असल्याने आम्ही त्याचे बाहेरूनच दर्शन घेतले व त्याला लागून असलेली सर्व चक्रे घड्याळ्याच्या दिशेने फिरवली. आपल्याकडे जशी प्रदक्षिणा तशी त्यांची चक्रे असे काहीसे शास्त्र त्यामागे असावे.
मॉनेस्ट्रीच्या अंगणात कल्पा व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते. अगदी समोरच बर्फाच्छादित हिमशिखरे. रेकाँग पियो जवळपास साडेसात हजार फूट उंचीवर असल्याने तेथे थंडी बर्यापैकी वाजते. आकाशाचे सतत बदलणारे रूप, ऊन-सावली-पाऊस व त्यामुळे दरीचे दिसणारे सुंदर रूप कॅमेरात टिपून आम्ही चहा घेण्यासाठी आमच्या हॉटेलवर परतलो. येथे बर्फाच्छादित शिवलिंग व त्याच्या बाजूला पार्वतीचा बर्फाच्छादित पर्वतही पाहिला. अनेक ट्रेकर्स येथे या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी ट्रेकिंग करतात, असेही ऐकले.