मुंबई | Mumbai
जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला (Terror Attack) झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जणांचा समावेश आहे. या हल्यामुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.अशातच आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये हल्ला केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूरच्या डुडु-बसंतगड परिसरात (Area) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. या ठिकाणी लष्कराने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. तर काही जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.या घटनेने संपूर्ण देशात संताप आणि शोक व्यक्त होत आहे.
दरम्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल (Security Forces) तैनात करण्यात आला आहे. तर अनेक पोलीसही त्यांच्यासोबत या मोहिमेत सहभागी असल्याचे समजते. सध्या काश्मीर खोऱ्यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी सक्रिय असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच पहेलगाम घटनेनंतर सातत्याने चकमक उडत आहे.
लष्कराची जोरदार कारवाई
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठी कारवाई सुरू केली आहे. बुधवारी सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून दोन एके सीरीजमधील रायफल्स, चिनी बनावटीचे पिस्तूल, १० किलोग्रॅम आयईडीसह इतर सामान हस्तगत करण्यात आले आहे. हे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण त्यापूर्वीच त्यांचा खात्मा करण्यात आला.