लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
कांदा भाव प्रश्नी शासनाने गठित केलेल्या माजी पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांच्या समितीने कांदा बाजार भावातील घसरण त्यावरील उपाययोजना संदर्भात लासलगाव बाजार समितीत काल बैठक घेतली शेतकरी, विविध संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी यांच्याशी चर्चा करत आढावा घेतला. राज्य शासनास 8 दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
लासलगाव बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य पणन संचालक विनायक कोकरे, कृषी पणन मंडळ उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे तर समितीचे सचिव नाशिक विभाग कृषी पणन मंडळ उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, सदस्य ललित दरेकर व्यापारी संचालक नंदकुमार डागा, प्रशासक सविता शेळके, सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.
गेल्या पंधरा दिवसात कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्या मुळे ठीकठिकाणी शेतकरी आंदोलनाने हा मुद्दा अधिवेशनात गाजल्याने राज्य शासनाकडून ही समिति नेमण्यात आली. लासलगाव बाजार समितीत आज या समितीने शेतकरी व व्यापार्यांची बाजू समजून घेतली आहे मात्र ही समिती अहवाल तयार करेल आणि अहवाल शासनाला देणार आहे.
मागील दोन महिन्यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला पाचशे रुपये प्रती क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात यावे जास्तीजास्त निर्यात वाढवावी येणार्या आठ ते दहा दिवसात नव्याने लागवड केलेला उन्हाळ कांदा बाजार आल्यानंतर अवघड परिस्थिती पहावयास मिळेल याकडे या माजी सभापती जयदत्त होळकर यांनी लक्ष वेधले. कांद्याचे बाजार भाव पाडण्यासाठी नाफेड मार्फत खरेदी केली जात असल्याचा आरोप करत अधिकारी येऊन आजपर्यंत प्रश्न सुटले नाही मग आज काय होणार असा सवाल शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचेजिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी केला
बांग्लादेश आणि श्रीलंकेत आयात शुल्क लावल्याने कांदा पाच ते सात रुपये खर्च वाढला याचा फटका शेतकर्यांना बसत आहे तसेच इंदोनिशिया कांदा पाठवण्यासाठी ग्लोबल गॅप लागते असून हा ग्लोबल गॅप रद्द करण्यासाठी 7 ते 8 लाख रुपये एका व्यापार्याला लागत आहे सौदी अरब येथे कांदा पाठवण्यासाठी उेल सर्टिफिकेट लागते कंटेनर मागे टर्मिनल चार्जेस 45 ते 50 हजार रुपये विना कारण घेत आहे भाडे वाढ झाली आहे चांगल्या प्रतीचे बियाणे दिले पाहिजे सफेद कांद्याची लागवड केली पाहिजे याकडे लक्ष देण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापारी ओमप्रकाश राका यांनी केली.
या बैठकीला विजय सदाफळ, दिलीप गायकवाड , व्यापारी नंदकुमार डागा, नितीन जैन, मनोज जैन, नवीनकुमार सिंग, प्रवीण कदम, प्रशांत सुराणा, शेतकरी अनिल जाधव, आप्पा साहेब चव्हाण, संजय जाधव, शिवाजी उगलमुगले, निलेश पालवे, संतु बोराडे, दगू गवारे, भाऊसाहेब भंडारे, रामनाथ दरेकर, रामकिसन दुमले, भ्रष्टाचार समिती बाळासाहेब दौंड, विष्णु साबळे, भास्कर गाजरे, उत्तम जगताप, विठ्ठल गाजरे आदि उपस्थित होते.
कांद्याचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदीची प्रक्रिया सुरू केली आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र लासलगाव बाजार समितीत अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कांदा खरेदी झालेली नाही. कांदा खरेदीची फक्त घोषणाच झाल्याचे दिसत आहे. नाफेड सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार जिल्ह्यातील काही बाजार समितीतून 900 टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. मुळात एका दिवसात नाशिक जिल्हयात दीड लाख क्विंटल कांदा विक्री होतो. त्यात नाफेडने दोन दिवसांत 9 हजार क्विंटलची कांदा खरेदी केली. त्यामुळे कांदा दरात काही वाढ होईल याची शक्यता कमी आहे.