मुंबई | Mumbai
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतला आहे. या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याला महाराष्ट्रभरातून विरोध झाल्यानंतर कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घ्यावी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात फडणवीसांनी म्हटले की, “या विषयावर आपली फोनवर सविस्तर चर्चा झाली आहे आणि त्यावेळेस मी कांदा निर्यातीवर लावण्यात आलेली बंदी उठवावी, अशी विनंती तुम्हाला केली होती. तरी पुन्हा एकदा मी विनंती करतो की, कांदा निर्यातीवर लावण्यात आलेली बंदी त्वरीत मागे घेण्यात यावी. महाराष्ट्राच्या कांद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असते आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकरी दुःखी आहे. यावर तुम्ही त्वरीत योग्य निर्णय घ्याल,” अशी मला आशा आहे.
देशात कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने एका पत्रकाद्वारे जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रासह देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. दरम्यान कांदा निर्यातीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे शेतकरी संतप्त झाले असून यामुळे कांद्याच्या दरात वाढ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.