Saturday, May 4, 2024
Homeनगर75325 कांदा उत्पादकांचे अनुदानासाठी अर्ज

75325 कांदा उत्पादकांचे अनुदानासाठी अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फेब्रुवारी महिन्यांत राज्यात झालेली कांद्याच्या दरातील घसरण आणि शेतकरी संघटनांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले आहे. या योजनेत नगर जिल्ह्यात 20 एप्रिलपर्यंत 75 हजार 325 शेतकर्‍यांनी अनुदानासाठी अर्ज केला असून यात सर्वाधिक हे नगर तालुक्यातील 31 हजार 290 शेतकर्‍यांचा तर सर्वात कमी पाथर्डी तालुक्यातून अवघ्या 300 शेतकर्‍यांचा समावेश आहे. कांदा अनुदानासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

- Advertisement -

बाजार समिती, खासगी बाजार; तसेच नाफेडकडे कांदा विक्री करणार्‍या उत्पादकांना मिळणार आहे. राज्यात गेल्या वर्षी उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे कांद्याचे पीक बहुतांशी वाया गेले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड उशिरा केली होती. ते पीक डिसेंबरअखेरीस येणे अपेक्षित होते. मात्र, जानेवारीनंतर बाजारात कांद्याची मोठी आवक झाली. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल घसरण होत असल्याचे बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाले.

कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी; तसेच शेतकरी संघटनांकडून कांद्याला अनुदान देण्याची मागणी होऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने माजी पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादकांना अनुदान देण्याबाबत शिफारस करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील शेतकरी, आडते, व्यापारी; तसेच तज्ज्ञांशी चर्चा केली होती. त्यानंतर तयार केलेला अहवाल राज्य सरकारला सुपूर्द केला होता.

त्या अहवालात डॉ. पवार यांनी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी केल्या होत्या. त्यानूसार राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 350 रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अनुदान योजनेत काही तालुक्यात चांगला तर काही तालुक्यात अर्ज दाखल करण्यास अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अजून 8 ते 9 दिवसांची मुदत असल्याने 30 एप्रिलनंतर किती शेतकरी या योजनेत अर्ज करणार हे पाहणी महत्वाचे ठरणार आहे.

दाखल अर्ज

नगर 31 हजार 290, राहुरी 6 हजार 332, राहाता 1 हजार 343, संगमनेर 7 हजार 307, अकोले 403, कोपरगाव 5 हजार 557, श्रीरामपूर 1 हजार 397, नेवासा 5 हजार 848, शेवगाव 1 हजार 831, पाथर्डी 300, जामखेड 4 हजार 690, कर्जत 1 हजार 404, श्रीगोंदा 1 हजार 258, पारनेर 6 हजार 365 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या