Monday, May 27, 2024
Homeनगरकांद्याच्या भावातील तेजी ओसरण्याची शक्यता कमी!

कांद्याच्या भावातील तेजी ओसरण्याची शक्यता कमी!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला 3 लाख मेट्रीक टन कांदा खुला करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेऊन शेतकर्‍यांना भिती दाखविली आहे. मात्र नाफेडकडील कांदा साठा हा अवघे काही दिवस पुरेल इतकाच असून यातील कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नाफेडचा कांदा सद्यस्थितीत दर रोखण्यासाठी फारसा परिणामकारक ठरणार नसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

- Advertisement -

यंदा जवळपास दिड महिना उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे बाहेरील राज्यातील कांद्याच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा न झाल्यास कांद्याच्या भावात भविष्यात तेजीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कांद्याला अपेक्षित दर न मिळाल्याने मागील तीन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात आहेत. चालू वर्षी एैन मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळी कांदा काढणीच्या वेळेस जिल्ह्यात सर्वदूर अवकाळीने तडाखा दिला. त्यामुळे बहुतांश कांदा भिजल्याने शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागले. अशा परिस्थितीतही दर वाढीच्या आशेने शेतकर्‍यांनी चाळीत कांदा साठवणूक केला. मात्र यातील बहुतांशी कांदा अवघ्या काही दिवसातच खराब झाला आहे.

मार्च ते जुलैपर्यंत जवळपास 5 ते 6 महिने कांदा भाव 800 ते 1200 रुपयांवरच स्थिर होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी कांदा खराब होण्यापेक्षा आहे त्या भावात विकल्याने शेतकर्‍यांना तोटाच सहन करावा लागला. यातून अनेक शेतकर्‍यांच्या हाती कांदा पिकासाठी झालेला खर्चही निघालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. तर ज्या शेतकर्‍यांकडे कांदा आहे त्यांनी विक्रीस सुरूवात केली असून थोडी दरवाढ होताच सरकारने भाव रोखण्यासाठी पावले उचलल्यास शेतकरी अडचणीत येणार आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात कांदा दर काही प्रमाणात वाढण्यास सुरूवात झाल्याने सरकारने नाफेडचा कांदा साठा खुला करुन भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. मात्र नाफेडकडील अपुरा साठा, त्यातच पावसाअभावी बाहेरील राज्यातील कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने कांद्याच्या भावात भविष्यात तेजी राहू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी एकाच वेळेस कांद्याची आवक न करता आपल्या कांद्याच्या टिकवण क्षमतेचा अंदाज घेऊन हळूहळु कांदा विक्रीस आणावा.

राजस्थान, कर्नाटक, मध्यप्रदेश या कांदा उत्पादक राज्यातही पावसाचे प्रमाण कमी असल्याने तसेच उशिराचा पाऊस यामुळे लागवडीचे क्षेत्रात घट झाल्याने हा कांदाही ऑक्टोबर महिन्यात दाखल होण्याची शक्यता मावळतीकडेच आहे. तर महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस नसल्याने नवीन कांद्याच्या लागवडी रखडल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत नवीन कांदा येण्याची शक्यता कमी आहे. सध्या आपल्याकडील कांद्याला चेन्नई, कोलकत्ता, बंगलोर, दिल्ली येथून मागणी वाढली आहे.

भाव पडले तेव्हा सरकारची दखल नाही

मार्च ते ऑगस्ट सहा महिने कांद्याचे दर साधारणपणे 800 ते 1200 रुपयांवर स्थिर राहिल्याने कमी भावात शेतकर्‍यांना कांदा विकावा लागला. त्यावेळी भाववाढ करण्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना झाल्या नाही. मात्र ऑगस्ट महिन्यात कांद्याची काहीशी दरवाढ झाली लगेच सरकारने कांद्याचा साठा खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अडचणीच्या काळातही शेतकर्‍यांच्या शेतीमालाचा विचार करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. तर कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडून बाजारभाव जाहीर करताना उच्चतम कांदा भाव जाहीर केले जातात. त्यामुळे कांदा बाजार भाव वाढल्याचे भासते. त्यामुळे बाजार समित्यांनी सरासरी कांद्याचे भाव जाहीर करावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

कांदा मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नाफेडने 3 लाख मेट्रीक टन कांदा खरेदी केलेला आहे. मात्र यात खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच लांबलेल्या पावसाचा परिणामही नवीन कांदा लागवडीवर झाला आहे. आंध्र, कर्नाटक येथही हीच परिस्थिती आहे. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नवीन लाल कांदा येतो मात्र यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे मागणी वाढल्यास कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे.

सुरेश बाफना, कांदा व्यापारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या