पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
कांद्याला चांगला बाजारभाव मिळू लागल्याने शेतकर्यांना दिलासा मिळत असतानाच चोरट्यांनी शेतकर्याच्या तोंडचा घास पळविला आहे. सुपा येथील पवारवाडी परिसरात पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत दीपक आनंदा पवार यांच्या कांदा चाळीतील 60 ते 65 गोण्या कांदा चोरट्यांनी लंपास केला. चोरीस गेलेल्या कांद्याची किंमत सुमारे 75 हजार रुपये आहे. ही घटना शनिवारी (दि. 19) पहाटे घडली. याबाबत दीपक आनंदा पवार (वय 43, व्यवसाय शेती, रा. पवारवाडी, नगर-पुणे रोडलगत, सुपा) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत पवारवाडी येथे त्यांच्या पत्र्याच्या कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चाळीकडे पाहिले असता गेट तुटलेले दिसले. चाळीतील कांदा चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील निवृत्ती गणपत पवार, नितीन दत्तात्रय पवार, हरिदास पवार व रवींद्र पवार यांच्याकडे चौकशी केली. मात्र, चोरीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे शनिवारी रात्री 1 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कांदा चाळीची जाळी तोडून 60 ते 65 गोण्या, सुमारे 75 हजार रुपये किमतीचा कांदा चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली.
सुपा पोलिसांनी दीपक पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने महामार्गापर्यंत माग काढला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खंडू लाळगे व गोरे पुढील तपास करीत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांनंतर यंदा कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला होता. सात-आठ महिने जपून ठेवलेल्या कांद्यावर चोरट्यांची नजर पडल्याने हाता-तोंडाशी आलेला घास चोरीला गेल्याने शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.




