Friday, November 22, 2024
Homeनगरकडक उन्हामुळे कांदा सडायला झाली सुरुवात

कडक उन्हामुळे कांदा सडायला झाली सुरुवात

संगमनेर तालुक्यातील शेतकरी पुन्हा सापडले संकटात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भविष्यात चांगले बाजारभाव मिळतील म्हणून अनेक शेतकर्‍यांनी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढल्याने साठवलेला कांदाही सडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

- Advertisement -

साधारण दोन महिन्यांपूर्वी अनेक शेतकर्‍यांनी कांदे काढले होते. मात्र, चांगला बाजारभाव नसल्याने अगदी कवडीमोल भावाने कांदे विकावे लागले होते. त्यानंतर चांगले बाजारभाव मिळतील या अपेक्षेने वाट पाहिली. परंतु, बाजारभाव वाढण्यापेक्षा कमीच होत गेले. परिणामी, चांगले बाजारभाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी कांदा लिलावही बंद पाडले होते. पुढे बाजारभाव वाढतील म्हणून काही शेतकर्‍यांनी अरणी व चाळीमध्ये कांदे साठवून ठेवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे साठवलेला कांदा आता सडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकरी कांदे विकू लागले आहेत.

आधीच कांद्यासाठी शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. काही शेतकर्‍यांचा खर्चही अंगलट आला आहे. त्यामुळे सध्या कडक ऊन कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मुळावर उठले असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. आधीच शेतमालाला बाजारभाव नाही, खत-औषधांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्यात पुन्हा एकामागून एक नैसर्गिक संकटे येत आहे. या सर्वांचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या