अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कांदा व्यापार्याकडे हमाली करणार्या दोघांनीच त्यांना लुटण्याचा प्लॅन केला. इतरांच्या मदतीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून 50 लाख लुटले. लुटमार करणार्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 20 लाख 50 हजारांची रोकड, वाहन, मोबाईल असा 25 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रिक्षा चालक व हमाल मुबारक गणीभाई आत्तार (वय 34, रा. मुकुंदनगर), हमाल सुनील छबू माळी (वय 22, रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) हमाल अक्षय आण्णा बाचकर (वय 22, रा. गडदे आखाडा, ता. राहुरी), मयुर उर्फ भैय्या आनंथा गायकवाड, मनोज सुंदर शिरसाठ (दोघे रा. राहुरी खुर्द ता. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार नागेश संजय चव्हाण (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी), अक्षय गोपाळे (रा. बारागाव नांदुर ता. राहुरी), सागर चव्हाण (रा. मल्हारवाडी रस्ता ता. राहुरी), अक्षय छबु साळवे (रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी), अंकुश नामदेव पवार (रा. प्रगती शाळेसमोर, भिलाटी, ता. राहुरी) हे पसार झाले आहेत.
कांदा व्यापारी शोएब अन्वर सय्यद व त्यांचा भाऊ समीर सय्यद (दोघे रा. हाजी इब्राहीम बिल्डींग, स्टेशन रस्ता) हे दोघे 7 सप्टेंबर रोजी चारचाकी वाहनातून 50 लाख रुपये घेऊन जात असताना त्यांच्यावर केडगाव शिवारातील हॉटेल राजनंदिनी समोर कोयत्याने व लोखंडी रॉडने हल्ला करून 50 लाख रुपये लुटले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, फुरकान शेख, प्रशांत राठोड, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, शरद बुधवंत, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, अरुण मोरे यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता लुटीचा प्लॅन समोर आला.
नागेश चव्हाण व मुबारक आत्तार हे दोघे हमालीचे काम करतात. त्यामुळे त्या दोघांत ओळख आहे. मुबारक आत्तार हे व्यापारी सय्यद यांच्याकडे यापूर्वी कामास असताना त्यांच्यात वाद झाले होते. यामुळे सय्यद यांनी मुबारक याला कामावरून काढून टाकले होते. मुबारक याने नागेश चव्हाण यास सांगितले की, तुम्ही जर व्यापारी सय्यदला लुटले तर खुप पैसे भेटतील त्याच्याकडे खुप पैसे असतात. यावरून मुबारक व चव्हाण यांनी गुन्ह्यांचा प्लॅन तयार केला. त्यानंतर संशयित आरोपींनी दिनांक 5 व 6 सप्टेंबर रोजी नगर येथे येऊन, रेकी करून, सय्यद यांचे घर व कांदा मार्केट जाण्याचा रस्ता पाहून गेले होते.
7 सप्टेंबर रोजी मयुर गायकवाड व अक्षय बाचकर असे दुचाकीवर इंपीरिअल चौक, नगर येथे थांबून सय्यद बंधू निघाल्यानंतरची माहिती इतर साथीदारांना दिली व त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानुसार केडगाव परिसरात दुसर्या दुचाकीवर सुनील माळी व अक्षय साळवे व केडगाव बायपासजवळ कारमध्ये नागेश चव्हाण, अक्षय गोपाळे, सागर चव्हाण, मनोज शिरसाठ अशांनी थांबून सय्यद बंधूची चारचाकी केडगाव बायपास येथे आल्यावर पाठलाग करून हॉटेल राजनंदिनीसमोर अडवून सय्यद बंधूंवर हल्ला केला व 50 लाख रुपये बळजबरीने हिसकावून घेतले असल्याची कबुली दिली आहे.