वीरगाव |वार्ताहर| Virgav
ऑक्टोबर हिटचा तडाखा उन्हाळी कांदा रोपे आणि भाजीपाला पिकाला बसू लागल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसणार आहे. खरिपाच्या बाजरी, सोयाबीन आणि मका पिकाच्या काढणीला पोषक वातावरण असले तरी या पिकांचेही उष्णतेने नुकसानच केले. तीव्र उष्णतेमुळे जनमाणसांना आरोग्याच्या समस्याही भेडसावण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या अकोले तालुक्यातील आढळा परिसरात सुर्याचे आग ओकणे सुरू असून दिवसा 34 अंश सेल्सिअस तापमान आहे. रात्रीचेही तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने पहाटेचा काही तासांचा गारवा सोडल्यास बाकीच्यावेळी वातावरणात उष्माच असतो. कोवळेपणात असणार्या उन्हाळी कांदा रोपांना या उष्णतेही दाहकता सहन होत नसल्याने जळण्याचे प्रमाण वाढले.त्यांची मर वाढून त्यावर करपा आला. मका उष्णतेने पिवळ्या पडल्या असून अवेळी काढणीसाठी आल्या. टोमॅटो, दोडका, कारले आणि इतरही फळवर्गीय पिके आणि पालेभाज्यांचा तजेला उष्णतेने संपला आहे. पहाटे पडणार्या दहिवरामुळे भाजीपाला पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे.
चार्याच्या पिकांचीही आता होरपळ वाढलेली आहे. शेतातील घास आणि इतर हिरवा चारा उष्णतेमुळे कोमेजून गेला आहे. पावसाच्या प्रतिक्षेत पिकांचे हाल झाले होते. उत्तरा फाल्गुनी आणि हस्ताच्या पावसाने काही प्रमाणात गारवा तयार केला मात्र तो अल्पावधीचाच ठरला. ऑक्टोबर हिटमुळे सर्वत्र उष्णतेची लहर असून उभ्या पिकांना पाणी हवेच आहे त्यामुळे कृषीपंपांसोबतच थंडाव्यासाठी घरगुती विजेची मागणीही वाढली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे दिवसेंदिवस तपमानात वाढ होत आहे. हिटवेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती असते. त्यामुळे शेतात काम करणार्या मजुरांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केली आहे.
दोन वर्षांनंतरचे सुख
गेली सलग दोन वर्षे ऐन खरिपाच्या काढणीला अवकाळी पावसाने दगा दिला. बाजरी, सोयाबीन आणि मका सोंगणीला जोरदार पाऊस झाल्याने ही सारी पिके हातातून गेली होती. धान्य तर वाट्याला आलेच नाही शिवाय वैरण-कडबाही भिजून गेल्याने माणसांसहित जनावरांची चंदी पावसात वाहून गेली.त्या तुलनेत यंदा मात्र उष्णतेच्या तडाख्याने काही प्रमाणात नुकसान झाले तरी सोंगणी चालू असलेला सारा खरीप हातात येईल.
काळजी घ्या
सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 अंश सेल्सिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट संबोधतात. यात उष्माघात, सनबर्न, हिट क्रॅम्पस (स्नायुत गोळे येणे), हिट एक्झॉस्टेशन (उष्णतेने थकवा जाणवणे) यासारखे प्रादुर्भाव होत असल्याने शेतमजुरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.