श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
सायबर गुन्हेगारांना महिन्याच्या मोबदल्यावर स्वतःच्या नावाने उघडलेली बँक खाती वापरण्यास देऊन ऑनलाईन फसवणुकीस मदत केल्याप्रकरणी श्रीरामपूरमधील पाच जणांना दिल्ली सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे. या खात्यांमार्फत सुमारे 13 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा गुन्हा दिल्ली येथे दाखल असून, आरोपींना 72 तासांच्या ट्रान्झिट वॉरंटवर (एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठीचे वॉरंट) दिल्लीला नेण्यात आले आहे.
याप्रकरणी एस सायबर साऊथ-वेस्ट, दिल्ली एफआरआय क्र. 24/2025, दि. 04 सप्टेबर 2025 अन्वये बीएनएस कलम 318, 4, 112(2) व 340 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीधर दिलीप इंगळे, अर्चियन गोरक्ष कांबळे, अजिज मीरान शेख, प्रणव जालिंदर गुलदगड, विशाल दुर्गादास बच्छाल (वय 21, रा. गुरुनानक नगर, श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी स्वतःच्या तसेच इतरांच्या नावाने बँक खाती उघडून ती सायबर गुन्हे करणार्या टोळीला मंथली रेंट बेसिसवर वापरण्यास दिली. या खात्यांद्वारे ऑनलाईन फ्रॉड करून पैशांची अफरातफर करण्यात आल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या ग्राऊंड ऑफ अरेस्ट नुसार, विशाल बाचल याने सहआरोपी श्रीधर इंगळे याच्यासह काही व्यक्तींची कॅनरा बँक व बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाती उघडून ती चैतन्य नावाच्या व्यक्तीकडे वापरण्यास दिल्याचा संशय आहे. त्याच्या मोबाईलमध्येही संशयास्पद संपर्क व डिजिटल पुरावे सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आरोपींच्या वतीने अॅड. आरिफ शेख, सौरभ गादीया, साजेब शेख व अभिजीत शेळके यांनी बाजू मांडताना, संबंधित कलमांनुसार शिक्षा 7 वर्षांपेक्षा कमी असल्याने अटक कारवाई योग्य नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, आरोपींना दिल्ली न्यायालयात हजर करणे आवश्यक असल्याने येथील सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिल्ली सायबर क्राईम पथकाची 72 तासांच्या ट्रान्झिट वॉरंटची मागणी मंजूर केली. यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक पाचही आरोपींना ताब्यात घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहे.




