नाशिक | प्रतिनिधी
जलयुक्त शिवार (२.०) योजनेतून नाशिक जिल्हा परिेषदेच्या ६९ कोटींच्या आराखड्यातील केवळ ९.४६ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेने नवीन बंधारे व जुने बंधारे दुरुस्तीची ३२५ कामे प्रस्तावित केली होती. प्रत्यक्षात ४५ कामांनाच प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या आराखड्यातील उर्वरित गावांमधील कामांवर फुली मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या आराखड्यातील उर्वरित कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेला आणखी ६० कोटींचा निधी लागणार आहे.
जलयुक्त शिवार २.० या योजनेतून नाशिक जिल्ह्यात २३१ गावांची निवड करण्यात आल्यानंतर त्या संबंधित गावांमध्ये जिल्हा परिषदेचा जलसंधारण विभाग, वनविभाग, मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग व भूजल सर्वेक्षण या विभागांनी त्यांच्याकडील उपलब्ध यंत्रणेनुसार कामांचे नियोजन केले. त्यानुसार या २३१ गावांमध्ये सर्व यंत्रणांनी मिळून २९४३ कामे प्रस्तावित केली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने ३२५ कामे प्रस्तावित केली होती.
या कामांपैकी जिल्हाधिकारी कार्यालयाने केवळ ४५ कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून या कामांना ९.४६ कोटी रुपये निधी दिला मंजूर केला आहे. प्रत्येक तालुकानिहाय कामांचा विचार केल्यास एकेक तालुक्याला सरासरी तीन कामे मिळाली आहेत. तसेच २३१ गावांपैकी केवळ ४५ गावांमध्येच जलयुक्त शिवार योजनेची कामे होणार आहेत.
तालुकानिहाय कामे मंजूर झालेली गावे
मालेगाव : पोहाणे, कजवाडे, सावकारवाडी, रामपूर, कंधाणे,- नांदगाव : घोटाणे बुद्रूक, नांदूर, वाखारी, गणेश नगर- येवला : कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रूक, बदापूर, भुलेगाव, एरंडगाव, शिरसगाव लौकी, कानडी- इगतपुरी : चिंचलखैरे, धारगाव,- त्र्यंबकेश्वर : मुलवड- दिंडोरी : गांडोळे, चिल्लरपाडा, बोरवन, घामचोंडपाडा रायतळे- निफाड : निमगाव वाकहा, करंजगाव, कसबेसुकेणे- सटाणा : मानूर, नरकोळ, पठावे दिगर- सुरगाणा : अंबोडे, हेंबडपाहा,-कळवण : दह्याणे दिगर-चांदवड : शिवरे, धोतरखेडे, बोराळे, दुधखेडे- नाशिक : लहवित, लोहशिंगवे- सिन्नर : फर्दापूर, हरसूल, देवळा : सांगवी