राज्यात अवयवदानासाठी प्रतीक्षा यादी वाढत आहे. पुणे विभागात दोन हजारांपेक्षा जास्त आणि मुंबई विभागात साधारणत: चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
अवदानाविषयी असलेले गैरसमज आणि रुग्णाच्या कुटुंबियांची भावनिक गुंतागुंत लक्षात घेतली तर अन्य विभागांमधील परिस्थिती यापेक्षा वेगळी नसावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’ मध्ये या विषयावर भाष्य केले. 2013 मध्ये पाच हजारांपेक्षा कमी लोकांनी अवयवदान केले होते. 2022 मध्ये ही संख्या पंधरा हजारांपेक्षा जास्त झाल्याचा दाखलाही पंतप्रधानांनी दिला. पहिले अवयवदान अमेरिकेत 1954 साली पार पडले. दोन जुळ्या भावांच्या शरीरात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती.
शस्त्रक्रिया करणार्या डॉ.जोसेफ मरे यांना 1990 मध्ये शरीरविज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. इतक्या वर्षानंतरही अवदान करणार्या व्यक्तींची संख्या फक्त 15 हजारांपर्यंत पोहोचली आहे. यावरुन या क्षेत्रातील आव्हानांची कल्पना यावी. मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे कुटुंबिय रुग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेऊ शकतात. अशा व्यक्तीच्या दोन्ही किडन्या, यकृत, स्वादुपिंड, फुफ्फुस, ह्दय, आतडे, डोळे आणि टिश्यू अशा अवयवांचे दान केले जाऊ शकते.
ही कृती 7-8 लोकांना जीवनदान देऊ शकते. तथापि अशा रुग्णाच्या कुटुंबियांसाठी असा निर्णय घेणे सोपे नसते. सामुहिक भावनांचा प्रश्न त्यांना सतावणे स्वाभाविक आहे. किती कुटुंबिय त्यावर मात करुन अवयवदानाचा निर्णय घेऊ शकतील? अवयवदान केल्यावर अंत्यविधी करता येत नाही आणि मृतदेह विद्रुप होतो, प्रामुख्याने हे दोन गैरसमज आढळतात असे या क्षेत्रातील कार्यकर्ते सांगतात. रुग्णांना फसवून त्यांचे अवयव काढून घेतल्याच्या घटनाही अधूनमधून चर्चेत असतात. त्याही अवयवदान मोहिमेविषयी नकारात्मकता वाढवू शकतात. लोकांच्या मनात शंका निर्माण करु शकतात. तथापि अवयवांची विक्री आणि खरेदी कायद्याने गुन्हा आहे. सरकारने अवयवदानाची प्रक्रिया सुलभ केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अवयवदानाशी संबंधित माहिती, संबंधितांचे संपर्क क्रमांक, वेबसाईट आणि प्रक्रिया याविषयची माहिती देणारे फलक सरकारी दवाखान्यांमध्ये लावले जायला हवेत. अवयवदान म्हणजे जीवनदान हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी सामाजिक संस्थांना सातत्याने प्रयत्न करत राहावे लागेल.
अवयवांचे दुखणे आणि कार्यक्षमतेअभावी अनेकांचे जगणे वेदनामय बनते. वेळेत अवयवदान मिळाले नाही तर काहींचा मृत्यू होण्याचा धोका डॉक्टरही नाकारत नाहीत. मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या अवयवदानाचा निर्णय अशा व्यक्तींना त्यांचे श्वास परत करु शकतो. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यात सुखाची पहाट फुलवू शकतो. भारतीय संस्कृतीतही दानाचे अपरंपार महत्व सांगितले आहे. त्याअर्थानेही जीवनदान हे महादान मानले जाते. त्यासाठी सक्षम यंत्रणेची उभारणी, दानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, सामान्यांना त्या प्रकियेची माहिती असणे आणि जनजागृती या आव्हानांवर सरकारे मात कशी करणार यावर अवयवदानाचा वेग वाढणे अवलंबून आहे.