राहूल गांधींची भारत जोडो यात्रा नुकतीच समाप्त झाली. तथापि आपण एवढ्यावरच थांबणार नाही असे सुतोवाच राहूल यांनी करुन नव्याने चर्चेला मुद्दा दिला आहे. चांगल्या कल्पनांवर विचार सुरु असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. काँग्रेस नेते वेणूगोपाल यांनी यात्रेचा दुसरा टप्पा असेल असे जाहीर करुन टाकले. कन्याकुमारी ते काश्मिर दरम्यानच्या या यात्रेत राहूल यांनी साधारणत: चार हजार किलोमीटरचे अंतर चालत पार केले. ही यात्रा राजकीय हेतूने काढली गेली नसल्याचे वारंवार सांगितले गेले. तरीही यात्रेच्या पहिल्या दिवसापासून तीच चर्चा रंगत होती. यात्रेच्या राजकीय यशापयशाचे मूल्यमापन अजून काही दिवस सुरुच राहिल. राजकीय पक्षांनुसार यात्रेचे फलित तपासण्याचे निकषही बदलत जातील. तथापि सामान्य माणसांना यात्रेमुळे काय मिळाले हेही तितकेच महत्वाचे मानावे लागेल. ‘इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा, तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल’ असे महात्मा गांधी म्हणत. भारत जोडो यात्रेमुळे राहूल यांच्या व्यक्तिमत्वाचा कायापालट झाला असे मत जाणते व्यक्त करतात. तथापि अशा यात्रांनी समाजमन देखील प्रभावित होत असते. याचे प्रत्यंतर यात्रेदरम्यान वारंवार आले. मोठमोठ्या दिग्गजांसहित सामान्य माणसेही उत्साहाने यात्रेत सहभागी झाली होती. राजकीय पक्षांच्या सर्वेसर्वांचे सामान्यांना विलक्षण आकर्षण असते. पण सामान्य माणसे त्यांच्यापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाहीत. तथापि भारत जोडो यात्रेदरम्यान राहूल सामान्य लोकांमध्ये सहज मिसळले. त्यांची सुखदु:खे समजावून घेतली. सामान्यांना नेमके काय हवे आहे हेही जाणून घेण्याचा आणि त्यांच्यातीलच एक होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रात्रेदरम्यानचे अनेक किस्से त्यांनी माध्यमांना सांगितले. यात्रेदरम्यान एकदा त्यांना भिकारी मुले भेटली. प्रचंड थंडीतही त्या मुलांच्या अंगावर फाटकेच कपडे होते. त्याप्रसंगानंतर राहूल यांनी संपूर्ण यात्रेदरम्यान टीशर्ट परिधान केला. हा त्यातीलच एक किस्सा. यात्रेदरम्यानच्या अशा अनेक प्रसंगांमुळे ते आपल्यातीलच एक आहेत ही भावना सामान्यांच्या मनात निर्माण झाली असेल. यात्रेने त्यांना खर्या अर्थाने लोकनेता बनवले असे म्हणता येईल. त्यांना आता पप्पू सारख्या इतर कोणत्याही हिणकस विशेषणांनी हिणवता येणार नाही याची जाणीव कदाचित त्यांच्या विरोधकांनाही झाली असावी. ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ’ ही त्यांची भावना सामान्यांच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेली असेल. भेदाभेदाच्या मुद्यांवरुन समाजात दहशत अनुभवास येते. राजकीय खेळात पक्षांचा खेळ होतो आणि जीव मात्र सामान्यांचा जातो अशी भावना लोकांच्या मनात आहे. राहूल यांनी व्यक्त केलेल्या निर्मळ भावनेने त्रस्त लोकांच्या मनात नक्कीच उमेद जागवली असेल. भारताची धर्मनिरपेक्ष प्रतिमा दृग्गोच्चर होण्यासही यात्रेचा हातभार लागला. ही यात्रेची मोठीच उपलब्धी मानावी लागेल. राहाता राहिला यात्रेमुळे काँग्रेस पक्षाच्या राजकीय फायद्याचा मुद्दा. राजकारणाच्या पटलावर प्रतिमा धुसर झालेला पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. त्या पक्षाला नवसंजीवनी मिळेल का? यात्रेमुळे निर्माण झालेले वातावरण टिकवून ठेवण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी होईल का? असे प्रश्नही समाजमाध्यमांवर विचारले जात आहेत. कोणत्याही राजकीय यात्रेचे तात्कालिक फायदे त्वरीत अनुभवास येतात. दीर्घकालीन फायदे कळण्यासाठी काही काळ नक्कीच जावा लागतो. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्राही त्याला अपवाद नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते गोंधळात आहेत. ही यात्रा अनेक राज्यांमधून गेली. यात्रेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद जागवण्यासाठी करुन घेणे ही त्या त्या राज्यांमधील नेत्यांची जबाबदारी आहे. ते ती कशी पार पाडतात हेही येणारा काळच सांगेल.