Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधशाळा उघडा !

शाळा उघडा !

करोनामुळे (Corona) शाळा(School) अनेक दिवसांपासून बंद (bandh)आहेत. शाळा नाही, परीक्षा नाही म्हणून सुरुवातीला काही दिवस पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र आता शाळा बंद असण्याचे दुष्परिणाम (Side effects)समोर येऊ लागले आहेत. आपल्याकडे ऑनलाईन (Online learning) शिक्षणपद्धतीचा बोजबारा (Bojbara)उडाला आहे. मध्यंतरी प्रकाशित झालेला एक अहवाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. या अहवालाच्या निमित्ताने केलेला ऊहापोह.

शाळा बंद झाल्या तो दिवस आता अनेकांना आठवतही नसेल. शाळा बंद झाल्या तेव्हा सोशल मीडियावर आज शाळा नसण्याचा पहिला दिवस, दुसरा दिवस, मग एक आठवडा, मग एक महिना, मग एक सत्र अशा पोस्ट फिरायच्या. आता दिवस तर सोडाच पण सत्रही कोणी फारसे मोजताना दिसत नाही. एक विलक्षण उदासी, मरगळ, हतबद्धता आणि निराशा शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये आली आहे. सलग दुसर्या वर्षीदेखील शाळा नाही, परीक्षा नाही, शिक्षण नाही, मूल्यमापन नाही, स्पर्धा नाही, गुणवत्ता नाही अशी औदासिन्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसे पहायला गेले तर शाळा ऑनलाईन मोडमध्ये सुरू आहेत.

पण ते शिक्षण खरे नाही हे सर्वजण जाणतात. त्यात भर म्हणजे सातत्याने खंडित होणारी इंटरनेट सेवा, न परवडणारे स्मार्टफोन्स, घरात एकच स्मार्टफोन आणि शिकणारी मुले दोन; मग कुणी, कधी शिकायचे याचा उडालेला गोंधळ. कारण त्यांच्या शाळांच्या वेळा एकच! आज या मुद्द्यापलीकडे जाऊन या प्रश्नाची मानसिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक बाजू समोर येत आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

पूर्वी शाळा नाही आणि परीक्षा नाही म्हणून राजकारणी, विद्यार्थी, शिक्षक, पालक सुखावले होते. चघळायला एक विषय मिळाला म्हणून मीडियादेखील खूश होता. पण हे सगळे अल्पजीवी होते. पुढे परीक्षा नाही आणि ‘वरच्या वर्गासाठी उत्तीर्ण’ असे शेरे येऊ लागले तेव्हा पालकांना, शिक्षकांना सामाजिक शास्त्रज्ज्ञांना भीषणता जाणवू लागली. पालक, शिक्षक, विद्यार्थी मागणी करू लागले, ‘

शाळा उघडा’… नुकताच ‘इमर्जन्सी रिपोर्ट ऑन स्कूल एज्युकेशन’ प्रकाशित झाला. त्यातले संशोधन डोळ्यांमध्ये अंजन घालणारे आहे. एकूणच ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा कसा बोजबारा उडाला, ते या संशोधनात सोदाहरण, पुराव्यासकट सिद्ध झाले आहे आणि हे संपूर्ण भारतात घडतेय, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

काय आहेत या संशोधनाचे निष्कर्ष? पहिला निष्कर्ष आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणपद्धतीशी फारसे जुळवून घेता आलेले नाही. त्याची कारणे अनेक आहेत. या सगळ्यामुळे शिक्षणाची परिणामकारकता जवळपास शून्यवत झाली आहे. दुसरा निष्कर्ष समाजाच्या निम्न स्तरात आई-वडिलांपैकी एकाचा अथवा दोघांचेही रोजगार बुडाल्यामुळे फी परवडत नाही म्हणून मुलांना शाळेतून काढून घेण्यास किंवा टाकण्यात आले आहे आणि हे चित्र जसे ग्रामीण भागात आहे तसेच शहरी भागात देखील आहे. याचा परिणाम साक्षरतेवर होणार हे उघड आहे. त्यामुळे निरक्षरांची संख्या वाढणार आणि आर्थिक विषमतेचे, पिळवणुकीचे संदर्भ देखील गडद होणार.

तिसरा निष्कर्ष म्हणजे दिवसभर रिकाम्या असलेल्या मुलांचे काय करायचे? याला मानसिक, शारीरिक, बौद्धिक, कौटुंबिक स्वास्थ्याचे अनेक आयाम आहेत. शाळेत न गेल्यामुळे आणि आई-वडील फारसे बाहेर खेळायला जाऊ देत नसल्यामुळे कित्येक मुलांना दोन वर्षांमध्ये साधा घाम देखील आलेला नाही. मुलांमध्ये अनेक मानसिक आजार रूजले आहेत, चिडखोरपणा, एकलकोंडेपणा वाढला आहे.

निरर्थकपणे मोबाईल अथवा कॉम्प्युटरचा स्क्रीन वर-खाली करणे आणि शून्यवत बसणे या घातक सवयींमुळे मुले एकलकोंडी बनत आहेत. बौद्धिक, शारीरिक चलनवलन नसल्यामुळे त्यांचा मानसिक, बौद्धिक विकास खुंटला आहे. गेले अनेक महिने वर्गातल्या मित्रांमध्ये न मिसळल्यामुळे ही मुलं संभाषणच हरवून बसली आहेत. समाजात कसे वागावे, कसे बोलावे, रहावे याचे कुठलेच शिक्षण, बाळकडू त्यांना मिळालेले नाही. लक्षात घ्या, हे सर्व तब्बल पाचशेहून अधिक दिवस सुरू आहे आणि एवढा मोठा शैक्षणिक खंड हा कायमस्वरुपी मानसिक आघात करण्यात पुरेसा आहे. एक अख्खी पिढी गेले पाचशेहून अधिक दिवस मानसिक, भावनिक, शारीरिकदृष्ट्या कुपोषित राहिली आहे.

चौथा निष्कर्ष विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीविषयी आहे. सरकारी शाळांमधून चालणारी माध्यान्ह भोजन योजना बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे आणि प्रथिनांच्या कमतरतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्यामुळे ही मुले एक प्रकारची शारीरिक दौर्बल्याची अवस्था झेलत आहेत.

सरकारी अहवाल सांगतो, 80 टक्के मुलांपर्यंत शाळेव्यतिरिक्त माध्यान्ह भोजन योजना आम्ही आजही पोहोचवत आहोत. यात वस्तुस्थिती, कागदावरील आकडे यात तफावत आहे. शिवाय आपण 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू न शकल्याची कबुली सरकारच देत आहे. भारतासारख्या अतिविशाल देशात 20 टक्के हा आकडा देखील प्रचंड मोठा आहे. हा आकडा एखाद्या छोट्या युरोपियन देशातल्या लोकसंख्येइतका आहे. हा संशोधन अहवाल आणखी एका बाबीकडे लक्ष वेधतो.

ती बाब म्हणजे, परीक्षाच न होणे. त्यामध्ये परीक्षेचा अभ्यास, पूर्वतयारीचा अनुभव, त्या निमित्ताने वेळेचे व्यवस्थापन- येणारा तणाव कौशल्यपूर्वक हाताळण्याची वृत्ती या सगळ्यापासून विद्यार्थी आज वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यातल्या स्पर्धात्मक गुणवत्तेवर कायमस्वरुपी परिणाम झाला आहे.

शिक्षण ही एक प्रक्रिया आहे. ती फक्त वर्गातूनच चालते असं नाही तर वर्ग ही शिक्षण मिळण्याची एक जागा आहे. शिक्षकांबरोबरच आसपासचं शैक्षणिक वातावरण, आजूबाजूची मुलं, त्यांच्या बरोबरचा संवाद, सभोवताली घडणार्‍या गोष्टी, त्यावरच्या प्रतिक्रिया याच्या निरिक्षणातून, अनुभवातून आणि एक प्रकारच्या सामुहिकतेतून शिक्षण प्रक्रिया फुलत असते. आज हे सर्व थांबले आहे. मुले शाळेत परत यायला लागतील त्यावेळी नेमक्या कुठल्या गोष्टीपासून सुरुवात करायची, असा प्रश्न शिक्षक आजच विचारू लागले आहेत.

कारण, सहावीचे गणित शिकवताना चौथी आणि पाचवीच्या गणितातल्या शैक्षणिक संकल्पना मुलांना समजल्या आहेत, असे गृहित धरून बारीकशी उजळणी करून शिक्षक सहावीचे गणित शिकवतात. पण आता तसे करता येणार नाही. त्यामुळे शाळा उघडल्यानंतरची शैक्षणिक प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची, क्लिष्ट बनणार आहे. मुलांच्या वाचनाच्या, सहजीवनाच्या शैक्षणिक वातावरणाच्या सवयी तुटल्याला देखील आता बराच काळ लोटला आहे. ते हा अहवाल ठळकपणे नमूद करतो.

एकीकडे सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवत आहे तर कोरोनामुळे शाळा बंद असण्याच्या काळात मुलींना शाळेतून काढून टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. घरची छोटी-मोठी कामे आणि बाहेरची दोन-चार छोटी कामे यात त्यांचे बालपण आणि शिक्षण हरवून जात आहे, नजीकच्या काळात दिसणार हे उघड आहे.

शाळा बंद ठेवणे हा करोनापासून दूर राहण्याचा सोपा उपाय आहे आणि तोच आजपर्यंत आपण योजत आलो. पण शाळा सुरक्षितपणे उघडणे हे नियोजनाचे खरे मोठे आव्हान आहे आणि त्याबद्दल आपण दिशाहीन आहोत. शाळा सुरक्षितपणे उघडण्यासाठी लागणार्‍या इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. त्या संदर्भातले कोणतेही नियोजन समोर येत नाही. मग अंमलबजावणीतली सतर्कता तर दूरच राहिली.

संशोधन अहवालात समोर आलेली विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची एकमुखी मागणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे शाळा सुरू करा! शाळा सुरक्षितपणे सुरू करण्याची मागणी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमधून केली जात आहे.

या देशात कोविड येऊन आता 20 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. कोविडशी लढण्याचा, त्याला रोखण्याचा आणि अलीकडे त्याच्यासोबत जगण्याचा पुरेसा अनुभव आता धोरणकर्त्यांकडे आहे.

उद्याची पिढी मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम ठेवायची असेल तर आज पुरेशी काळजी घेऊन अंशत: का होईना, शाळा सुरू करणे आधोरेखित होत आहे. शाळा बंद ठेवणे ही सोयीस्कर पळवाट आहे तर शाळा उघडणे आणि सुरक्षितपणे चालवणे हा कौशल्यपूर्ण उपाय आहे. हे कौशल्य आता यंत्रणांनी दाखवायला हवे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या