मुंबई Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. रोहितशिवाय, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थांगावेलू या खेळाडूंचीही भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे.
राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि अन्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निर्णयाबद्दल राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची आज मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रोहितपूर्वी, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.
रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरू शकतो. 1998मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. 2007मध्ये भारताला टी-20 विश्वविजेता बनवल्यानंतर धोनीने तर, 2018मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत विराट कोहलीने हा पुरस्कार पटकावला होता.
गेल्या चार वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या जोरावर हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशस्तीपत्र, शाल याव्यतिरिक्त खेळाडूला 7.50 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. 2019च्या विश्करंडक स्पर्धेत रोहितने 648 धावा करत दमदार कामगिरी नोंदवली होती. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने 2019च्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये पात्रता मिळवली.
मनिकाने 2018च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदक तर, 2018च्या एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले. वर्ल्ड पॅरा-अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवल्यानंतर, मारियाप्पन पुढच्या वर्षीच्या पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग, माजी पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ मेहता, बॉक्सर वेंकटेशन देवराजन, क्रीडा भाष्यकार अनिश बटाविया आणि पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया यांचा समावेश आहे.