अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शेतकर्याने शेतात ज्वारी आणि मका पिकाच्या मध्यभागी 30 बाय 30 फुट जागेत अफूची लागवड केल्याचा प्रकार नगर तालुका पोलिसांनी तालुक्यातील सारोळा कासार शिवारात 7 मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी शेतात लागवड केलेली 4 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीची अफूची 4275 लहान-मोठी झाडे जप्त करत शेतकरी बबन उर्फ अशोक आसाराम शिर्के (रा. सारोळा कासार, ता. नगर) यास अटक केली आहे.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना गोपनीय माहिती मिळाली की, सारोळा कासार शिवारात खडकी रोड ते दरेमळा जाणार्या रोडवर असलेल्या शेतात शेतकर्याने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अफूची (खसखस) लागवड केलेली आहे.
ही माहिती मिळताच सहायक गिते यांनी नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना संपर्क करून माहिती सांगितली. भोसले यांनी छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर 7 मार्चला गिते यांच्यासह हवालदार एस.व्ही. खरात, राहुल द्वारके, महिला एम.एन. काळे, दि. बी. घोरपडे, आर. आर. शिंदे यांच्या पथकाने दोन सरकारी पंच संजय शिवाजी राहिंज व असिफ जाकीर शेख यांना बोलावून घेत सारोळा कासार शिवारात असलेल्या बबन उर्फ अशोक आसाराम शिर्के याच्या गट नंबर 317/4 यामध्ये छापा टाकला तेथे ज्वारी आणि मकाचे पिक दिसून आले. त्यानंतर गोपनीय माहितीनुसार या पिकाच्या मध्यभागी जावून पाहणी केली असता तेथे 30 बाय 30 फुट जागेत अफूची लागवड केल्याचे दिसून आले.
पोलिसांनी शेतात लागवड केलेली अफूची 4275 लहान-मोठी झाडे त्यास हिरवट, पांढरट लहान मोठी बोंडे असलेली झाडे उपटून त्याचे वजन वजन केले असता ते 50 किलो 300 ग्रॅम भरले. त्याची किंमत 4 लाख 27 हजार 500 रुपये एवढी असून पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. याबाबत राहुल द्वारके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बबन उर्फ अशोक आसाराम शिर्के (रा. सारोळा कासार, ता. नगर) याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्के याला अटक करण्यात आली आहे.