शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
अफूच्या झाडाची आपल्या शेतात बेकायदेशीररित्या लागवड करणार्या संशयित आरोपीस शेवगाव पोलीस पथकाने 11 लाख 43 हजार 600 रुपये किमतीच्या मुद्देमालासह गजाआड केले. गणेश नवनाथ घोरतळे (वय 22, रा. मारुती वस्ती, बोधेगाव, ता. शेवगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गणेश घोरतळे याने बंदी असलेल्या अफूच्या झाडाची बोधेगाव शिवारात त्याच्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारमार्फत मिळाली. त्यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या पथकासह छापा टाकला. घोरतळे याने अंदाजे चार गुंठे क्षेत्रामध्ये शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफूच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याचे आढळून आले. मुद्देमालाचा पंचनामा करून त्यामध्ये अफूची 953 लहान मोठी झाडे, बोंड असलेली झाडे जप्त केली. त्याचे अंदाजे वजन 39.685 किलो इतके आहे.
पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरम सिंग सुंदरडे, अशोक काटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुशारे, किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, राहुल खेडकर, भगवान सानप, प्रशांत आंधळे, एकनाथ गडकर, संपत खेडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका निजवे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केली.