नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी डलास, टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थी तसेच भारतीय समुदायाशी संवाद साधताना भारतीय राजकारण, लोकसभा निवडणुकांचे परिणाम, भाजपाची पीछेहाट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी यावर भाष्य केलं. तसेच, भारताच्या राज्यघटनेवर हल्ला सहन केला जाणार नाही, या भूमिकेची पुनरावृत्तीही केली.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचा पक्ष यांच्यातील वैचारिक फरकदेखील अधोरेखित केला. “आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही भारत हा अनेक विचारांचा देश असल्याचे मानते.” प्रत्येकाला सहभागी होण्याची, स्वप्ने पाहण्याची मोकळीक असायला हवी. त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा अथवा इतिहास विचारात न घेता त्यांना स्थान मिळाले पाहिजे. देशातील लाखो लोकांना स्पष्टपणे समजले की पंतप्रधान भारताच्या संविधानाला धक्का लावत आहेत. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजप बद्दलची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालाच्या काही मिनिटांतच हे घडले. त्यामुळे हे मोठे यश आहे. हे देशातील जनतेचे यश आहे; ज्यांनी लोकशाहीची जाणीव करून दिली.”
पुढे ते म्हणाले की, “ही लढाई आहे आणि ही लढाई २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाली जेव्हा भारताच्या लाखो लोकांना समजले की, पंतप्रधान भारताच्या संविधानावर हल्ला करत आहेत. मी तुम्हाला जे काही सांगितले ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. हेच लोकांना निवडणुकीत स्पष्टपणे समजले आणि मी ते घडताना पाहिले.”
“मला वाटते की आपल्या राजकीय व्यवस्थेत आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये प्रेम, आदर आणि नम्रता दिसून येत नाही. यामुळे भारतीय राजकारणात प्रेम, आदर आणि नम्रता रुजवण्याची माझी भूमिका आहे.” असेही ते म्हणाले. राहुल गांधींचा अमेरिका दौरा तीन दिवसांचा आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा दौरा अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी तसेच भारतातील हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत आहे.
आपल्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा मी संसदेतील माझ्या भाषणात अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतिक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपाला ते सहन होत नव्हतं. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे लोकांतून भाजपाची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिलं. त्यामुळे हे मोठं यश आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा