Monday, June 24, 2024
Homeनगरपावसाचा नगरला आज ऑरेंज अलर्ट; मतदान घडवून आणण्याचे आव्हान

पावसाचा नगरला आज ऑरेंज अलर्ट; मतदान घडवून आणण्याचे आव्हान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मागील आठवड्यात उन्ह आणि उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना दोन दिवसांपासून बरसणार्‍या अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. मात्र, त्यातच आज ऐन मतदानाच्या दिवशी (13 मे) भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. यामुळे जिल्ह्यात वादळासह पावसाची शक्यता असून त्याचा परिणाम मतदानावर होऊ न देता जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचे आव्हान राजकीय पक्षांसोबत जिल्हा प्रशासनासमोर राहणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी बरसत आहे. विशेष करून नगर दक्षिणेतील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शेवगाव, पाथर्डी याठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. यासह अकोले आणि कोपरगावला वादळ झालेले असून पुढील आठ दिवस राज्यात अवकाळी बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावलेली असून रविवारी आणि सोमवार (आज) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अर्लट भारतीय हवामान विभाागाने वर्तवला आहे. यामुळे जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता आहे.

या काळात जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलो मीटरच्या वेगाने वार्‍यासह विजांचा कडकडाट आणि वादळाच्या गडगडाटात अवकाळी बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे झाल्यास मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षांसोबत निवडणूक यंत्रणेसमोर जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याचे आव्हान राहणार आहे. दरम्यान शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वारे, तसेच वीज पडून मनुष्यहानीसह जनावरे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यासह घरांच्या पडझड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शनिवारी झालेल्या पाऊस आणि वादळात जामखेड तालुक्यात दोन जनावरे मृत्यूमुखी पडलेली असून कृषी विभागाच्या माहितीनूसार शेवगाव आणि कर्जत तालुक्यात 5 ते 6 हेक्टरवरील केळी आणि आंबा पिकांचे नुकसान झालेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या