म्याडम, त्या दुसरीच्या सोनीने बघा काय केलेय? फोनवर पलीकडून शाळेतल्या स्वयंपाकी मावशी बोलत होत्या. सोनी… कितवीची? काय केले तिने पुन्हा ? मी जरा वैतागून मावशींना विचारले. शनिवारी सकाळची शाळा असते. शाळा करून मी दुपारी 12 वाजता नुकतेच घरी पोहोचले होते.
म्याडम, त्या दुसरीच्या सोनीने बघा काय केलेय? फोनवर पलीकडून शाळेतल्या स्वयंपाकी मावशी बोलत होत्या.
सोनी… कितवीची? काय केले तिने पुन्हा ? मी जरा वैतागून मावशींना विचारले. शनिवारी सकाळची शाळा असते. शाळा करून मी दुपारी 12 वाजता नुकतेच घरी पोहोचले होते. मागच्याच आठवड्यात तिसरीत शिकत असलेल्या सोनीने शाळेशेजारच्या शेतातल्या झाडावर चढून तिथले कवठ चोरल्याने मालक भांडत शाळेत आला होता. माझ्या प्रश्नावर मावशी म्हणाल्या, तिसरीची नाही, दुसरीची सोनी. त्या पारडेपाड्याची काय केले, मारामारी की भांडण ते परवडले असते. मी सोडवले असते ते. नेमके अधीक्षक म्याडम सातवीच्या दोघा मुलींना घेऊन तालुक्याला गेल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला. तुमच्याच वर्गात आहे ना ती येते मी शाळेत परत. गाडीवर अर्धा तास लागेल किमान. पण नेमके काय झाले ते सांगा मावशी..
ते आपण जेवण दिले ना, तेव्हा ती पूर्ण जेवली नाही. पोळी ठेवून दिली होती तिने. त्यावर जॅम लावून खाल्ला तिने. शाळेत जॅम कसा काय आला पण? तिच्या घरून कोणी आले होते का? आणि काय झाले जॅम खाल्ल्यावर? जॅम लावून रोल केला तिने असे मुली सांगत होत्या. त्यातले दोन घास खाल्ले. ती उड्या मारतेय मस्त. पण तोंडातून फेस येतोय तिच्या. आता मात्र मी घाबरले. घाबरतच मी मावशींना म्हणाले, बापरे. आलेच मी. तिला मिठाचे पाणी द्या. ती उलट्या करेल. मग आपण तिला नेऊ दवाखान्यात.
मी तडक गाडी काढून शाळेच्या दिशेने निघाले. शाळेत पोहोचले तेव्हा मावशी आणि दोघी-तिघी मुली मला बाथरूमजवळ दिसल्या.
मी : काय झाले, सोनी कुठे आहे? खूप उलट्या करतेय का? गळून गेली असेल. आधीच बारीक आहे बिचारी. तिच्या खोलीतल्या मुलींना रागावून मी म्हणाले, काय गं, किती वेळा सांगायचे की बाहेरचे काहीही आणून खात जाऊ नका. काय झाले त्या लेकराला पाहिले ना? वेड्यासारखे वागता. सर्व मुलींनी खाली मान घालून माझा ओरडा खाऊन घेतला. शांतपणे उभ्या होत्या.
मी पुन्हा त्यांना म्हणाले, बोलता का गं पोरींनो काही? कुठून आला जॅम तिच्याकडे?
एक मुलगी : न्हाई म्याडम, सोनी आमाला चिडवत व्हती. म्या ज्याम चपाती खाणार हाय असं. आमी मागितलं बी. पर तिने न्हाय देल.
मी सोनीला बाहेरूनच विचारले, कोणता जॅम खाल्लास? कोणी आणून दिला?
बिचारी आतूनच ओरडली, त्ये मोठ्या बाटलीत हाये ज्याम. मांगच्या सोमवारी दिला ना तुम्हीच.
मी विचार करत राहिले. नेमके काय दिले मी? कोणता जॅम आणला होता
मी? तिच्या रूममध्ये जाऊन बघावे लागेल या विचाराने मी बाकीच्या
मुलींना म्हणाले, चला रूममध्ये जाऊन शोधूया नेमका कोणता जॅम खाल्ला तिने. काहीतरी असेल तिकडे. मावशींना तिकडेच उभे करून मी सोनी राहत असलेल्या खोलीत गेले. खोलीत बरीच शोधाशोध केली. सरतेशेवटी तिने खाल्लेली पोळी दिसली. अर्धी खाल्ली होती तिने. मी ती पोळी हातात घेतली. पोळीतून छान वास येत होता. मी पोळी उकलून पाहिली. आणि डोक्यावर हात मारून घेतला. झालेला प्रकार लक्षात येताच घाबरावे, हसावे की रडावे ते माझे मलाच कळेना. माझ्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, काही होणार नाही तिला. दोन-तीन उलट्या होतील आणि जुलाब होऊन पोट साफ होईल. फक्त यामुळे ती गळून जाईल. थोडा अशक्तपणा येईल. तर तिला कोरा चहा आणि ग्लुकोजचे पाणी देत राहा. उद्यापर्यंत ठीक होईल ती. फोन ठेवताच मी तणावातून बाहेर आले होते. फोन ठेवताच मी सोनीच्या रूमबाहेर गेले.
मावशी, दोघी मुली आणि सोनी बाथरूमबाहेर उभ्या होत्या. सोनी रडत होती. मावशींनी तिला बरेच रागावले होते. एव्हाना सोनीला जुलाब सुरू झाल्याने ती गळून गेली होती. ती जीवाच्या आकांताने मावशींना सांगत होती की, माझ्या पोटातून आता साप पण बाहेर पडला. असं कसं, म्या तर साप खाल्ला नव्हता.
आता मात्र मला हसू आवरेना.
मावशी : काय झालं म्याडम, का हसताय?
मी : मावशी … आपल्या सोनी बाईने जॅम खाल्ला ना, तो जॅम नाहीये. वेडाबाईने हॅण्डवॉश पोळीवर लावून त्याचा रोल करून खाल्लाय. त्यावर पाणी प्यायल्या बाईसाहेब. म्हणून तोंडातून फेस आला. आणि हो ते साप वगैरे काही नाही, सोनीच्या पोटातली जंत पडलीत.
हे ऐकताच आम्ही दोघी आणि बाकी मोठ्या मुली मोठ्याने हसलो. आमचे हसणे बघून सोनी मात्र पूर्ण गोंधळली.