Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याजादा आरोग्यसेवक कमी करण्याचे आदेश

जादा आरोग्यसेवक कमी करण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा वाढता संसर्ग लक्षात घेत शासनाच्या आदेशानुसार महापालिकेकडुन गेल्या जुन महिन्यात सहा महिन्यासाठी मानधनावर भरण्यात आलेले 180 डॉक्टर्स, 250 स्टाफ नर्स यासह पॅरामेडीकल स्टाफ कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- Advertisement -

राज्यात करोनाचा प्रभाव कमी झाल्याने झालेल्या निर्णयानुसार आता नाशिक महापालिका देखील सध्या जादा ठरत असलेला स्टाफ कमी करणार आहे. गरजेनुसार कमी हां स्टाफ कमी करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात केली जाणार आहे.

महाराष्ट्रात करोनाचा वाढता संसंर्ग लक्षात घेत राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेकडुन मनपा वैद्यकिय विभागात 180 डॉक्टर, 250 स्टॉफ नर्स, पॅरामेडीकल स्टाफ असा सुमारे 849 जणांची मानधनावर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. सलग दोन वेळा ही प्रक्रिया राबवून यात अपेक्षित पदे भरली गेली नव्हती. त्यानंतर जुलै महिन्यात थेट भरतीची प्रक्रिया राबविल्यानंतर सुमारे 555 उमेदवारांनी कार्यदेशानुसार रुग्णालयात काम सुरू केले होते.

त्यानंतर काही आरोग्य सेवक रुजू झाल्यानंतर कामावर आले नसल्याने ही संख्या 526 इतकीच राहिली होती. जुलैनंतर ऑगस्ट महिन्यात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात करोना संक्रमण झाल्याने आयुक्तांनी कार्यादेश देऊन हजर न होणार्‍या डॉक्टरसह इतर आरोग्य सेवकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता.

अशाप्रकारे करोनाचा वाढता प्रादुर्भाय लक्षात घेऊन आरोग्य सेवक काम करण्यास घाबरल्याचे दिसुन आले होते. आता मात्र आक्टोंबर पासुन करोनाचा प्रादुर्भाय कमी होत असुन नवीन रुग्ण संख्या 250 ते 300 च्या आता आली असुन मृत्युचे प्रमाण 3 – 4 वर आले आहे. यामुळेच आता महापालिका व खाजगी कोविड केअर सेंटर व हेल्थ सेंटर रिकामे झाले आहे. तसेच कोविड रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

या एकुणच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडुन आता करोनासाठी मानधनावर तीन व सहा महिन्यासाठी घेण्यात आलेल्या डॉक्टरांसह आरोग्य सेवकांची संख्या जादा झाली असल्यास ती कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे आता महापालिकेच्या आस्थापनावर मानधनावर असलेल्या 526 आरोग्य सेवकांपैकी गरजेइतके सेवक ठेवून जादा आरोग्यसेवकांना कमी करण्यात येणार आहे. मात्र हा निर्णय नोव्हेंबर महिन्यात एकुण आढावा घेऊन घेतला जाणार आहे.

अगोदरच 12 आरोग्य सेवकांचा राजीनामा

महापालिकेत करोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्याच्या कालावधीसाठी मानधनावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांपैकी 12 ते 13 डॉक्टरांनी आपले राजीनामे वैद्यकिय विभागाकडे दिले आहे. करोना योध्दा म्हणुन काम केलेल्या या तात्पुरत्या वैद्यकिय अधिकार्‍यांना अनुभवावर दुसर्‍या ठिकाणी संधी मिळाली, स्वत:चे रुग्णालय सुरू करण्यासाठी आदी कारणामुळे त्यांनी आपले राजीनामे महापालिकेला सोपविले आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

त्या सेवकावर दरमहा साडेपाच कोटी खर्च

करोनाचा संसर्ग वाढत असतांना डॉक्टरांसह पॅरामेडीकल स्टाफ गरजेचा असतांना या भरतीकडे करोनाच्या भितीने या आरोग्य सेवकांनी पाठ फिरविली होती. यामुळे शासनाकडुन या पदाकरिता तातडीने मानधन वाढवून देण्यात आले होते. यात वैद्य. अधिकारी (एमबीबीएस) यांना 60,000 रु. वरुन 100,000 रु., फिजीशियन (एम. डी.) 150,000 रु. वरुन 300,000 रु., भुलतज्ज्ञ 75,000 रु. वरुन 100,000 रु., वैद्य. अधिकारी (बीएमएएस) 40,000 रु. वरुन 60,000 रु. रेडीओलॉजीस्ट पदासाठी 75,000 रु. वरुन 100,000 रु. आणि ए. एन. एम. पदासाठी 8650 रु. वरुन 15,000 रु. असे मानधन वाढविण्यात आले होते. यात भरती झालेल्या पदावर महापालिका प्रशासनाकडुन दरमहा साडेपाच कोटी रुपये खर्च येत आहे. यामुळे आता ही जादा पदे कमी करुन यातील खर्च वाचला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या