Thursday, September 12, 2024
Homeनगरपरवानगी नसलेले व धोकादायक होर्डिंग हटवण्याचे आदेश

परवानगी नसलेले व धोकादायक होर्डिंग हटवण्याचे आदेश

नगर शहरातील सर्वच होर्डींगचे सर्वेक्षणसुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मुंबई येथे होर्डींग पडून 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर नगर महापालिकेला जाग आली आहे. नगर शहरात प्रमुख रस्त्यांलगत, खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या सर्व होर्डींगची तपासणी करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत.

अतिक्रमण निर्मूलन विभाग व महापालिका उपायुक्तांमार्फत शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ज्या होर्डिंगला परवानगी नाही, तसेच होर्डींग धोकादायक वाटत असेल, असे होर्डिंग हटवण्यात येतील. नियमानुसार परवानग्या दिलेल्या नसतील तर अशा परवानगी रद्द केल्या जातील अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक डॉ. जावळे यांनी दिली. दरम्यान, दोन दिवसांत सर्वेक्षणाचा अहवाल देण्यात येणार असून, त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई येथे वादळामुळे मोठा जाहिरात फलक पडून 14 जणांचे बळी गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात असलेल्या होर्डिंगची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मनपाकडे अवघ्या 384 होर्डिंगची नोंद उपलब्ध आहे. जाहिरात फलकांबाबत राज्य शासनाने सन 2022 मध्ये जारी केलेले नियम डावलून प्रमुख चौकात व रस्त्यालगत मोठ्या जाहिरात फलकांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासक डॉ. जावळे यांनी शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात परवानगी असलेल्या व नसलेल्या सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नियमानुसार परवानग्या नसल्यास अशा परवानगी रद्द करण्यात येणार आहेत. तसेच अनधिकृत होर्डिंगबाबत सर्वेक्षणाचा अहवाल येताच कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासक डॉ. जावळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या