Sunday, May 26, 2024
Homeनाशिकपतसंस्थांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पतसंस्थांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिन्नर । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने येत्या 29 व 30 जुलै रोजी त्र्यंबकेश्वर येथे पतसंस्थांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व पतसंस्थांनी, त्यांच्या पदाधिकारी व सेवकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.

- Advertisement -

येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेत तालुक्यातील पतसंस्थांच्या पदाधिकार्‍यांसमोर ते बोलत होते. फेडरेशनशी संपर्कात नसलेल्या पतसंस्थाच अडचणीत येत असून नाशिक जिल्ह्यातील येवला हे त्याचे चांगले उदाहरण आहे. येवल्यातील एकही पतसंस्था फेडरेशनशी संलग्न नव्हती. आता तेथील सर्व पतसंस्था अवसायनात असल्याची माहिती कोयटे यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पतसंस्था चळवळीत सुरू असलेल्या घडामोडी फेडरेशनमुळे कळतात. सहकार कायद्यातील बदल कळतात. काळानुरूप संस्थांना प्रगतीकडे कसे न्यायचे हे फेडरेशनमुळे समजायला सोपे जाते. कै. भास्करराव कोठावदे, कै. उत्तम ढिकले, विद्यमान कार्याध्यक्ष नारायण वाजे यांच्या परिश्रमांमुळे नाशिक जिल्ह्यातील पतसंस्थांची चळवळ जोमाने वाढल्याचे ते म्हणाले. पतसंस्था फेडरेशनचे काम चांगले असले तरी त्याच्या मार्केटिंगमध्ये आपण कमी पडलो. यापुढच्या काळात त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

सहकार चळवळीतले बदल समजून घेण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे असून शिबिराला जोडूनच 30 तारखेला दुपारी 12.30 वा. राज्य फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. शिबिराला सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील महारूद्र नागरी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाचेही यावेळी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाने पतसंस्थांना 10 टक्के अंशदान लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य फेडरेशनने पाठपुरावा करत हे अंशदान रद्द करण्यास सरकारला भाग पाडले. त्यामुळे पतसंस्थांचे दरवर्षी 120 कोटी रुपये वाचल्याचे ते म्हणाले.

शासनाने वाढवलेली ऑडिट फी निम्म्यावर आणण्यातही फेडरेशननेच पुढाकार घेतला होता याची आठवण करून देत सहकार चळवळीतील वेगवेगळ्या घडामोडी व केंद्रातील सहकार खात्याकडून होऊ पाहणारे बदल समजून घेण्यासाठी सर्व पतसंस्थांनी, त्यांच्या पदाधिकार्‍यांनी या शिबिराला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कोयटे यांनी केले. नारायण वाजे यांनी कोयटे यांचे स्वागत करत फेडरेशनच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

पतसंस्थांच्या जिल्हा बँकेत अडकलेल्या निधीबाबतही शासनाकडे पाठपुरावा सुरू असून सहकारमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी कैलास क्षत्रिय, संग्राम कातकाडे, नामकर्ण आवारे, अरुण वारुंगसे, डॉ. व्ही. एम. अत्रे, ईलाही शेख, बी. एम. पवार, संजय सोनवणे, केरू पवार, डॉ. प्रतिभा गारे, अंबादास वाजे, रामनाथ डावरे, मधुकर कोकाटे, युनूस शेख, भीमराव चव्हाण, अरुण भरीतकर यांच्यासह पतसंस्थांचे पदाधिकारी, व्यवस्थापक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या