नाशिक । प्रतिनिधी Nashik
“कायद्याने वागा लोकचळवळ’ चा उपक्रम महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था व झिम्माड काव्यसमूहाचा बहुचर्चित ‘झिम्माड महोत्सव २०२४’ यंदा १० आणि ११ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात होत आहे.
सुप्रसिद्ध लेखक श्रीकांत देशमुख हे या दोन दिवसीय महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविणार असून, यंदाचं हे या उपक्रमाचं सहावं वर्ष आहे. लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होईल तर कवी,गीतकार प्रकाश होळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवकुमार सोनवणे तसेच ’कायद्याने वागा लोकचळवळी’चे अध्यक्ष राज असरोंडकर यांचीही उपस्थिती असणार आहे. मराठी भाषा अभ्यासक व कवी वृषाली विनायक यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या झिम्माड महोत्सवाच्या आयोजन समितीत अरुण गवळी, जितेंद्र लाड, संध्या लगड, सुधीर चित्ते, शालिनी आचार्य या कवींचा समावेश आहे.
‘झिम्माड महोत्सव’ दरवर्षी पावसाळ्यात आयोजित केला जातो. साहित्यिक सहलीबरोबरच महाराष्ट्रातील कलासाहित्य क्षेत्रातील मंडळींचा परिचय, समन्वय, चर्चा, परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन, संगीत असं उपक्रमाचं स्वरूप असतं. दरवर्षी या महोत्सवात पावसाच्या सोबतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून कवी, लेखक, कलावंत, रसिक सहभागी होत असतात. यंदाचा उत्सवही असाच ऊर्जादायी होणार आहे.
सुप्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील यांची मुलाखत आणि ’नली’ हा एकल नाट्यप्रयोग रसिकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. कवितेच्या या गणगोतात महाराष्ट्रातील कलावंत, साहित्यिक, रसिकांनी तसंच अधिकाधिक नाशिककरांनी सहभागी व्हावं आणि साहित्य-कला महोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांनी केलं आहे.