नाशिक । Nashik
नाशिक जिमखाना तर्फे ऑनलाइन अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे १८ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष नरेेंद्र छाजेड यांनी दिली.
नाशिक जिमखाना संस्थेच्या वतीने चौदा वर्षांखालील वयोगटाकरीता प्रथमच ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जीमखान्याच्या वतीने वर्षभर विविध प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धांचे आयोजनांमधून संस्थेने बुद्धिबळ खेळासाठी गुणात्मक प्रयत्न केले आहेत.
विशेषतः लहान खेळाडूंमध्ये खेळाची गोडी वाढावी यासाठी पाऊले उचलली जात आहेत.
कोविड काळात खेळ आयोजनात आलेली मरगळ झटकून पुनश्च एकदा खेळाचे वातावरण तयार व्हावे यासाठी 14 वर्षांखालील खेळाडू मित्रांसाठी संस्थेमार्फत अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविली जाणार असून , संपूर्ण प्रत्येक डाव दहा मिनिटे इतक्या कमी कालावधीत खेळवला जाईल.
अतिशय नावीन्यपूर्ण ऑनलाइन आखणी असणार्या या स्पर्धेसाठी संस्थेने रोख पारितोषिके जाहीर केली आहेत.
संपूर्ण भारतभरातून खेळाडूंसाठी नोंदणी खुली असून सर्व बुद्धिबळ प्रेमी खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासठी फिडे पंच – मंगेश गंभीरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक जिमखाना संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड , सचिव राधेश्यामजी मुंदडा व सहसचिव शेखर भंडारी यांनी केले आहे.