Sunday, November 24, 2024
Homeक्राईमओरीसातून आलेला 200 किलो गांजा नगरजवळ पकडला

ओरीसातून आलेला 200 किलो गांजा नगरजवळ पकडला

63 लाखांचा मुद्देमाल हस्तगत || चौघांवर गुन्हा, तिघे अटकेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ओरीसा राज्यातून विक्रीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात आणलेला 47 लाख 92 हजार 800 रुपये किंमतीचा सुमारे 200 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. टेम्पोमधून गांजाची वाहतूक केली जात होती. गांजा, टेम्पो असा 63 लाख 22 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, टेम्पोतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून चौघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर ते जामखेड रस्त्यावर निंबोडी (ता. नगर) शिवारात एमआयआरसी हत्ती बारव येथे रविवारी (27 ऑक्टोबर) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस अवैध धंद्याविषयी माहिती काढत असताना तीन व्यक्ती टेम्पो (एमएच 02 ईआर 4045) मधून अंमली पदार्थ गांजा भरून खर्डा (ता. जामखेड) येथून अहिल्यानगरच्या दिशेने विक्रीकरिता घेऊन येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना रविवारी मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संतोष लोढे, अतुल लोटके, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड, अरुण मोरे, विजय ठोंबरे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने पंचासमक्ष जामखेड ते अहिल्यानगर रस्त्यावरील निंबोडी शिवारात एमआयआरसी, हत्ती बारव येथे सापळा लावून संशयित टेम्पो पकडला. त्यातील संतोष वसंत पठाडे (वय 35 रा. सम्राटनगर, वडगाव गुप्ता, एमआयडीसी, अहिल्यानगर), अक्षय सूर्यकांत भांड (रा. कोल्हार, ता. राहुरी), सतीष अंकुश काळे (वय 32, रा. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले. टेम्पोची झडती घेतली असता त्यात गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.

समीर सूत्रधार
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समीर इनामदार (पूर्ण नाव नाही, रा. अहिल्यानगर) याचे नाव सांगितले. सदरचा गांजा त्याच्या सोबत ओरीसा राज्यातून आणला असल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांना समीर इनामदार सापडला नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या