मुंबई । Mumbai
जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. तसतसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. याचदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. मुंबईत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या. आमचे फोन टॅपिंग करून माहिती देवेंद्र फडणवीस यांना देत होत्या. त्या आज पोलीस महासंचालक आहेत. त्यामुळे त्या निष्पक्ष निवडणूक करू शकता का? म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात तक्रार केली तेव्हा निवडणूक आयोग म्हणतो ते आमच्या हातात नाही. परंतु झारखंडच्या पोलीस महासंचालकांची बदली केली गेली, ते निवडणूक आयोगाच्या अधिकारात होते का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
तसेच, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्या निष्पक्ष पद्धतीने काम करत नाही. त्या विरोधकांना त्रास देतात. महाराष्ट्राचं पोलीस दल हे दबावाखील काम करत आहे आणि त्यांना आदेश देण्याचं काम रश्मी शुक्ला करत आहेत. आजही आमचे फोन टॅपिंग होत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार, हद्दपार आणि मकोका लावून निवडणूक आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचं सुत्रधार राज्याच्या पोलीस महासंचालक आणि पोलीस दल आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेने शिवाजी पार्कवर केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावरून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत असे कार्यक्रम हा एक सोहळा असायचा. तेव्हा निवडणुका व्हायचा नाहीत. आता निवडणुका जाहीर झाल्यात. अशा वातावरणात दीपोत्सवाच्या निमित्ताने राजकीय प्रचार होत असून, आचारसंहितेचा भंग होणार असेल आणि त्यावर कोणी आक्षेप घेतला असेल तर तो चुकीचा नाही. निवडणूक आयोग याची योग्य ती दखल घेईल, असंही संजय राऊत म्हणालेत.