पुणे | प्रतिनिधि | Pune
सख्खा साडूचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर दोन किमी अंतरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ रुग्णवाहिका मिळवण्यात तीन तास आणि स्मशानभूमीत दोन तास वाट पाहावी लागल्याने नगरसेवकाच्या संतापाचा उद्रेक झाला.
गेली सहा महिने अनेकांना हरप्रकारे मदतीसाठी अहोरात्र झगडणाऱ्या मनसेच्या नगरसेवकाने विलंबाला कारणीभूत असल्याचा आरोप करीत महापालिकेच्या उपयुक्ताच्या मोटारीचे ‘खळखट्याक’ करून उद्रेकाला वाट मोकळी करून दिली.
मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे याच्या साडूचे काल दुपारी कोरोनामुळे निधन झाले. भारती हॉस्पिटल येथून अवघ्या दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. यासाठी महापालिकेच्या व्हेइकल डेपो कडे रुग्ण वाहिका मागितली. परंतु सातत्याने फोन करूनही तीन तास रुग्ण वाहिका उपलबद्ध होऊ शकली नाही. यानंतर ती मिळाली पण स्मशान भूमीतील विद्युत दाहिनी मध्ये अगोदरच एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू होते आणि दोन पार्थिव असलेल्या दोन रुग्ण वाहिका तिथे रांगेत होत्या. एकच विदुयत दाहिनी असल्याने तिथेही रात्रीचे सव्वादहा वाजले. परंतु यादरम्यान संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी आणि वेहीकल डेपोच्या अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या बाबत एकमेकांकडे टोलवा टोलवी केल्याने वसंत मोरे यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आज सकाळी त्यांनी घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात जाऊन व्हेईकल डेपोचे प्रमुख उपायुक्त नितीन उदास यांच्या मोटारीची तोडफोड केली.
यासंदर्भात वसंत मोरे यांनी सांगितले, की सर्व खासगी रुग्ण वाहिका प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. अवघ्या दीड किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेह न्यायला नगरसेवकांना रुग्ण वाहिका उपलब्ध होत नाहित. तर सर्वसामान्यांना किती दिव्यांना सामोरे जावे लागत असेल. माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या मृत्यूनंतरही अधिकारी गांभीर्याने नियोजन करत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अंत्यसंस्काराबाबत स्मशानभूमीत ही तासंतास वाट पाहावी लागते. मृत्यूची संख्या पाहाता कोरोना बाधितांची केवळ विद्युत दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अगोदरच जिवंतपणी कोरोनाबाधितांची उपचारासाठी फरफट सुरू असताना मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाची हेळसांड होत असल्याबद्दल जनतेत तीव्र प्रतिक्रिया आहेत. ग्रामीण भागात विद्युत दाहिनी नाहीत. तिथे कोरोनाबाधितांवर पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. किमान मृत्यूची संख्या विद्युत दहिणीपेक्षा अधीक असताना पुण्यातील स्मशान भूमीत पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जावेत. परंतु सर्वच पातळ्यांवर फेल ठरलेल्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नागरिकांच्या भावनांचा उद्रेक माझ्या माध्यमातून झाला आहे.