Tuesday, May 5, 2026
HomeनगरPathardi : थकीत बिलामुळे पाथर्डी पंचायत समितीचा तोडली वीज

Pathardi : थकीत बिलामुळे पाथर्डी पंचायत समितीचा तोडली वीज

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

वीज बिल थकल्याने पंचायत समिती कार्यालयाचा वीज वितरण कंपनीने बुधवारी वीज पुरवठा खंडित केला. या प्रकारामुळे पंचायत समितीचा संपूर्ण कामकाज ठप्प झाले. प्रशासनाची बेजबाबदार, ढिसाळ व गलथान कार्यपद्धती पुन्हा एकदा समोर आली आहे. पंचायत समितीकडे तब्बल 65 हजार रुपयांचे वीज बिल थकीत होते. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेत पुरवठा खंडित केला.

- Advertisement -

या घटनेचा सर्वाधिक फटका थेट नागरिकांना बसला.वीजपुरवठा खंडित होताच पंचायत समितीतील दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. सध्या बहुतांश प्रशासकीय कामे संगणक प्रणालीवर अवलंबून असल्याने वीज नसल्यामुळे सर्व संगणक, सर्व्हर व ऑनलाईन सेवा बंद पडल्या. जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले, विविध योजना अर्ज, शासकीय कागदपत्रांची पडताळणी यांसारखी महत्त्वाची कामे थांबली. नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागले. याशिवाय पंचायत समितीतील विविध विभागांमधील अंतर्गत कामकाजही थांबले. फाईल्सची देवाणघेवाण, अहवाल सादर करणे, पत्रव्यवहार, ई-मेलद्वारे होणारे संवाद या सर्व प्रक्रियांना ब्रेक लागला.

अधिकारी व कर्मचारी यांना अक्षरशः अंधारात बसून वेळ काढण्याची वेळ आली. कार्यालयांतील पंखे, दिवे बंद असल्याने उकाडा व अस्वस्थता निर्माण झाली. या घटनेमुळे प्रशासनातील नियोजनशून्यता उघड झाली. एवढ्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात वीज बिलासारख्या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष होणे हे गंभीर मानले जात आहे. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर तातडीने 65 हजारांपैकी 35 हजार रुपये भरण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऐन मार्च अखेरच्या दिवसभरात झालेल्या कामकाजाच्या नुकसानीची भरपाई कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंचायत समिती कार्यालातील सोलर प्रकल्पावर मोठा निधी खर्च करूनही त्याचा उपयोग होत नाही. सोलर वीज पुरवठा असूनही एवढे वीजबिल कसे आले. शासनाच्या निधीचा हा दुरुपयोग आहे. याला जबाबदार कोण याची चौकशी करून कारवाई करावी. तसेच शौचालयांची स्वच्छता करणार्‍या कामगाराचे मानधन सहा महिन्यांपासून थकीत आहे. त्याची पत्नी सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे. त्याला मानधन देण्याऐवजी त्याच रक्कमेतून वीज बील भरून स्वच्छता कामगारावर अन्याय केला आहे.
– किसनराव आव्हाड, (आम आदमी पार्टी, अहिल्यानगर)

पंचायत समिती कार्यालयात सोलर प्रणालीची वीज उपलब्ध आहे मात्र कुणीतरी खोडसाळपणा करून जाणीवपूर्वक सोलर वीज जोडणी तोडल्यामुळे सोलरमधून निर्माण होणारी वीज खंडित झाली त्यामुळेच वीज बिल वाढले. अन्यथा सोलरमुळे बिल अत्यल्प येते.
– संगीता पालवे-कराड. (गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी)

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...