Monday, October 19, 2026
HomeनगरAhilyanagar : पानपट्टी व्यावसायिकांचा सरकार विरोधात एल्गार

Ahilyanagar : पानपट्टी व्यावसायिकांचा सरकार विरोधात एल्गार

7 जुलै रोजी आझाद मैदानावर धडक मोर्चा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून पान व्यावसायिकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. 7 जुलै 2026 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात राज्यभरातील लाखो पान व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष फैय्याज तांबोळी यांनी केले आहे.

- Advertisement -

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 3 जुलै 2026 रोजी अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी उपस्थित राहून व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. महासंघाच्या म्हणण्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे राज्यातील पानपट्टीधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुगंधित तंबाखूवरील बंदी, मोक्का अंतर्गत कारवाई, तसेच पान व्यावसायिकांवर होत असलेल्या कथित अन्यायकारक कारवायांमुळे व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मोर्चाद्वारे शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात येणार असून, त्यामध्ये अन्यायकारक कारवाया तात्काळ थांबविणे, सुगंधित तंबाखूवरील बंदी उठविणे, पानपट्टीधारकांना आर्थिक मदत व कर्जसुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक पान दुकानधारकाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत सामावून घेणे, तसेच पान व्यवसायासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे आदी मागण्यांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पानपट्टीधारक, होलसेल व्यापारी, फेरीवाले आणि संबंधित सर्व व्यावसायिकांनी 3 जुलैच्या मेळाव्यास तसेच 7 जुलैच्या मुंबई मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन संघटनेची ताकद दाखवावी, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तांबोळी यांच्या वतीने करण्यात आले.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...