पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे शेतात काम करत असलेल्या शेतकर्याच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी सहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहिनी कैलास शिंगोटे (वय 28) धंदा-शेती रा. कारवाडी, पाचेगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आम्ही सर्वजण घरासमोरील शेतात नेहमीप्रमाणे शेती कामासाठी घराच्या दरवाजाला कडी लावून गेलो होतो व शेती काम करत असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी आले असता घराच्या हॉलचा दरवाजा आतून लावलेला होता. तेव्हा मी घराच्या बेडरुमच्या दरवाजाने आत जाण्यासाठी चालले असता दोन अनोळखी इसम घरातून पळत आले.
त्यांना पाहून मी आरडाओरड केली असता त्यातील एका इसमाने मला ढकलून दिल्याने मी खाली पडले. ते पळून गेले. मी त्यांचे मागे पळाले असता ते त्यांचेकडील मोटारसायकलवर बसून निघून गेले.
माझ्या ओरड्यामुळे शेजारी राहणारे सारिका गायकवाड, सासरे शंकरनाना शिंगोटे, सासू गिताबाई शिंगोटे हे आले. त्यानंतर आम्ही घरात जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक केलेली दिसली. आमची खात्री झाली की कोणीतरी दोघा अनोळखी इसमांनी घराच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश करून 3 तोळे वजनाचे सोन्याचे जुने वापरते गंठण, गळ्यातील सोन्याची एकतोळा वजनाची पोत, गळ्यातील मुलाच्या एक तोळे सोन्याच्या दोन चेन व एक तोळ्याचे कानातले असे 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा रजिस्टर नं. 205/2023 भारतीय दंड विधान कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.