पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील मोठे गाव असलेल्या पाचेगाव येथे पोलीस चौकी (दूरक्षेत्र) सुरु करण्यात यावी, अशी मागणी पाचेगाव ग्रामस्थांनी केली आहे. सध्या गावात ‘दादा’ प्रवृत्तीचे लोक तयार झाले असून त्यामुळे रोज भांडण, मारामार्या, दारू मुळे तंटाबखाडे, शिवीगाळ असे प्रकार राजरोसपणे घडत आहेत. अवैध धंदे देखील जोमात सुरू आहे. दारू पिऊन तळीराम मध्यभागी रस्त्यावर चालतात. तळीराम रस्त्यावर चालताना शिवीगाळ करतात, त्यात येणार्या जाणार्या महिलांना रस्त्यावरून जाताना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या गोष्टी करत असताना तळीरामांमध्ये एक प्रकारचे चैतन्य पाहायला मिळत आहे. शाळेत व कॉलेजला येणार्या मुलींकडे वाईट नजरेने पाहणारी टारगट मुले देखील मोठ्या संख्येने तयार झाल्याने मुलींना शिक्षण घेण्यासाठी या मुलांपासून लपवून शाळेत यावे लागत आहे.
काही लोक बाहेरून गावात धंदा करण्यासाठी येतात पण हे तळीराम त्यांना देखील सोडत नाही. त्यांना देखील दमबाजीची भाषा वापरून दहशत निर्माण करतात. त्यामुळे या नागरिकांनी गावात एक पोलीस चौकी व्हावी जेणेकरून या गोष्टीला आळा घालण्यासाठी मोठी मदत मिळेल, अशी अपेक्षा महिला नागरिक करीत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी व गुजरवाडी या दोन गावांतील मुली पाचेगाव शाळेत येत आहेत, त्या पालक वर्गाने देखील पोलीस चौकी साठी आमच्या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ठराव तुम्हाला मिळून देऊ, असे मत व्यक्त केले.
ग्रामपंचायत प्रशासनाला आग्रह करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रांत पवार, भैय्या पटेल, जावेद पटेल, गणेश पंडुरे, पंढरीनाथ शिंदे, काशिनाथ मतकर, ग्रामपंचायत सदस्य पती मंजाबापू माळी, सुनील पटारे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. या अगोदर महिलांनी पुढाकार घेऊन हे अवैध धंदे बंद होण्यासाठी आवाज उठवला होता, पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आतातरी या गोष्टीवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकी देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी देखील केली आहे.
गाव तालुक्यात मोठे आहे, पण रोज बांधावरील, घरगुती, वैयक्तिक वाद होत आहेत. त्यात गावातील पोलीस पाटीलपद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थ सरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जातात. या पोलीस चौकीच्या माध्यमातून सहा गावांना फायदा होऊन गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांना आळा बसूून सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होईल. आमच्या गावासह इतर आम्ही पाच गावांच्या ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन गावात पोलीस चौकी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – वामनराव तुवर, सरपंच पाचेगाव