पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडील भागात सुरुवातीपासूनच पावसाने जोरात हजेरी लावून शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
त्यानंतर पावसाने एक आठवडा विश्रांती देत पुन्हा गुरुवारी एक ऑक्टोबरला हजेरी लावल्याने थोडा फार आलेला घास पाऊस हिरावून घेत असल्याचे चित्र मात्र पाचेगाव, कारवाडी व पुनतगाव परिसरात दिसत आहे.
मागील आठवड्यात पावसाने या भागात उघड दिल्यामुळे शेतातील कापूस काढणी व सोयाबीन सोंगणीला वेग आला होता. पण उघडीप दिलेल्या पावसाने अचानक हजरी लावल्यामुळे काही शेतकर्यांच्या शेतातील सोंगलेल्या सोयाबीनच्या खाली पाणी साचून पुन्हा एकदा शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पावसाने या भागात उघड दिल्यामुळे काही शेतकर्यांनी घेतलेले महागडे कांदा बी टाकल्याने त्यांचे देखील नुकसान झाले आहे.शेतात सोंगणी करून मळणी करण्यासाठी पडलेली बाजरीची कणसे पावसाने पूर्णपणे भिजली आहेत.
पाचेगाव परिसरात आतापर्यंत 815 मिमी इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. पण गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने शेतकरी वर्गाची दाणदाण झाली. यावर्षी पावसाने सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात हजेरी लावून शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांनी घेतलेली खरिपातील पिके अक्षरशः काळवंडली आहेत.
पाण्यात भिजलेल्या सोयाबीन काळसर पडून वाळविण्याचे काम या भागातील शेतकरी करीत आहेत. बाजरी पीक देखील भिजले आहे. मागील आठवड्यात पाऊस उघडून कडक उन्हात कापूस पांढराशुभ्र फुटला होता, पण कालच्या गुरुवारच्या पावसात बर्याचशा शेतकर्यांच्या शेतातील फुटलेला कापूस भिजून कपाशीच्या झाडाला कापसाच्या वाती लटकलेल्या पाहायला मिळत आहेत.
या भागात शेतकर्यांचे एवढे मोठे नुकसान होऊन देखील आतापर्यंत नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश देण्यात आले नाहीत. आणखी किती नुकसान झाल्यानंतर पंचनाम्याचे आदेश देणार आहे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. शेतकर्यांच्या शेतात उसासारखी पिके आडवी झाली.
उसाला कोणताही पीक विमा संरक्षण नाही. कारखान्याचे गाळप सुरू होण्याकरिता अजून वेळ आहे. तोपर्यंत ऊस पीक शेतात पडून राहणार आहे. शेतकर्यांना उसाचे वजन घटणार असल्याकारणाने मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
या भागातील शेतकर्यांची पिळवणूक न करता नुकसान भरपाई पंचनामे करण्यात यावे अशी आग्रही मागणी शेतकरी बळीराजा पार्टी जिल्हाअध्यक्ष हरिभाऊ तुवर,तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष दिलीप पवार, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, सुधाकर शिंदे, भगीरथ पवार, जालींदर विधाटे, चिलीया तुवर, बाळासाहेब कुलकर्णी, कारवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुधाकर तुवर यांच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.