Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : बिनपैशाचा तमाशा !

पडसाद : बिनपैशाचा तमाशा !

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण राज्यात झालेला अभूतपूर्व गोंधळ म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय संस्कृतीची छिन्न-विछिन्न प्रतिमा आहे. उमेदवारीसाठी लागणारा पक्षाचा अधिकृत पुरावा म्हणून अत्यावश्यक असलेला एबी फॉर्म मिळवण्यासाठी सर्व पक्षातच इच्छुकांनी केलेली यातायात उबग आणणारी ठरली. उमेदवारी मिळत नाही हे पाहून अनेकांनी आपापल्या पक्षाचा, नेतृत्वाच्या चार पिढ्यांचा केलेला उद्धार म्हणजे राजकारणाच्या विकृतीला आलेली विषारी फळे होय. उमेदवारी देताना पैशाच्या देवाणघेवाणीचे आरोप होणे, ही तर नेहमीचीच तर्‍हा. पण यंदा काहींनी उमेदवारी मिळाली नाही तर दिलेला आमरण उपोषणाचा इशारा किंवा आत्मदहनाचा केलेला प्रयत्न ही या नव्या राजकारणाची अपत्ये.

- Advertisement -

नाशिकमध्ये तर भारतीय जनता पक्षाने आयारामांची केलेली खोगीरभरती त्यांच्याच अंगलट कशी आली याचे जिवंत प्रक्षेपण जवळपास सर्वच माध्यमांनी केले आणि सर्वदूर लोकांनीही ते पाहिले. नाशिकच्या सिंहस्थ मेळ्यापेक्षाही या भानगडींची अधिक चर्चा यावेळी झाली असेल. भारतीय जनता पक्षाने शब्दश: शेकडो लोकांना पक्षात घेतले. तसे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील घेतले, पण भाजपमध्ये उमेदवारीवरून जी चुरस बघायला मिळाली, त्याचे परिणाम अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भोगावे लागले. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या याद्या देताना मुलाखतीनंतर भाजपच्या नेत्यांची छाती अभिमानाने फुगत होती. तेच नेते उमेदवारांना एबी फॉर्म देताना मात्र तोंड लपवित पळत असल्याचे विदारक चित्रही बघायला मिळाले. सर्वांनाच उमेदवारीचे शब्द देऊन पक्षात आणणे, त्याचवेळी पक्षातील निष्ठावान, जुने जाणते कार्यकर्ते यांनाही यंदा तुम्हीच आणि गेलाबाजार हौश्या नवश्यांनाही तुमच्याशिवाय आहेच कोण, याची प्रेरणा दिली गेल्याने भाजपमध्ये इच्छुकांचा अक्षरश: महापूर आला.

YouTube video player

प्रारंभी ही गर्दी गोड वाटली. परंतु अधिकृत उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा सर्वच नेत्यांना घाम फुटला. अर्थात, अशा प्रासंगिक गोंधळासाठी नेते तयार असतातच. ही वेळ एकदा गेली की पुन्हा पक्षाचा पुकारा करायला ते तयार असतात. त्यामुळे मंगळवारी अर्ज भरताना व त्याचवेळी एबी फॉर्म मिळविताना झालेला तमाशा याकडे बिनपैशाची घडीभरची करमणूक म्हणूनच पाहिले जाईल. निष्ठावानांचे शाब्दिक जोडे खाऊनही इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेणार्‍या भाजपने अशाच काही आयातांनाही उमेदवारीबाबत ठेंगा दाखविल्याची उदाहरणे आहेत. अशांची तर काय स्थिती झाली असेल याचा विचारही करवत नाही. ज्या प्रभाग क्रमांक तेरावरून मध्यंतरी गोंधळ झाला, आमदार फरांदेंनी थयथयाट केला, तेथे त्याचा फायदा काही प्रमाणात झाल्याचे दिसते. पक्षाकडे गर्दी झाल्याने हे होणारच, अशी मखलाशीही आता केली जाईल. गंमत म्हणजे हे असे होत असतानाच भाजपने अखेरच्या क्षणीही काही ठिकाणी इतर पक्षातील कार्यकर्त्यांना आयात करून बोहोल्यावर चढवले. याचाच अर्थ शंभर प्लसचा नारा ही केवळ भूमिका होती. कारण अखेरपर्यंत दुसर्‍या पक्षातील विजयाची शयता असलेल्यांना पक्षात प्रवेश दिले जातच होते. या खोगीरभऱतीमुळेच पक्षाला एवढी सूज आली की त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांना दूर ठेवावे लागले. आता ही सूज होती की खरे बळ याचा फैसला येत्या पंधरवड्यात लागेलच. तोपर्यंत तरी मोठ्या पक्षाच्या भानगडीही मोठ्या असे मानून चालावे लागेल.

भारतीय जनता पक्षाने उमेदवारांना द्यावयाच्या एबी फॉर्म वाटपासाठी काहीही नियोजन केलेले नसावे असे झालेल्या तमाशावरून वाटते. शहराध्यक्ष सुनील केदार हे एबी फॉर्म घेऊन निघालेल्या गाडीचा इच्छुकांनी सिनेस्टाईल पाठलाग करणे, ज्या बंगल्यावर ते पोहोचले तेथील प्रवेशद्वार तोडून आत घुसखोरी करणे, एबी फॉर्मवर ताबा मिळवित पलायन करणे अशा सगळ्या प्रकारांमुळे भाजपची उरलीसुरली संस्कृतीही धराशायी झाली. ठिकठिकाणी उमेदवारी न मिळालेल्यांनी पक्षनेत्यांचा शिव्यांसह केलेला उध्दार तर ऐकवतही नव्हता.

या सगळ्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे पक्षाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी प्रत्यक्षात अशी चौकशी काही होणार नाही आणि एकदा माघारीचे सोपस्कार झाले की पुन्हा हीच सारी मंडळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मार्गी लागतील. विशेष म्हणजे, ज्यांना सर्वांनीच दुर्लक्षित ठेवले त्या काँग्रेसमध्येही उमेदवारीवरून संघर्ष व्हावा आणि उमेदवारी न मिळालेल्या काही निष्ठावंतांनी काँग्रेस कमिटीवर मोर्चा नेऊन कार्यालयाला टाळे ठोकावे, असे विपरीतही घडले. शहरात औषधालाही शिल्लक न राहिलेल्या काँग्रेसमध्ये जर मोर्चा वगैरे काढण्याची ऊर्जा अजूनही शिल्लक असेल तर त्याकडे पक्षनेतृत्वाने समाधानी वृत्तीने पहायला हवे.

कारण जेथे पक्ष संपला असे सगळेच म्हणतात तेथेच जर असे काही घडत असेल तर काँग्रेस अद्याप संपलेली नाही, शेवटच्या घटकातील काही माणसे शिल्लक आहेत, असे म्हणावे लागते. शिवसेना शिंदे व ठाकरे तसेच मनसेमध्येही नाराजांची फौज होतीच. प्रत्येकाने आपापल्या पध्दतीने नाराजी व्यक्त केली. पण भाजपमधील इच्छुकांनी जसा राडा घातला तसा इतर पक्षात दिसला नाही. याचे कारण, भाजपची उमेदवारी म्हणजे विजयाची शंभर टक्के हमी असा ग्रह अनेकांचा आहे. तो दुराग्रह की चुकीचा याचा निकाल नंतर लागेलच. पण पालिकेत जाण्यासाठी या शेकडो इच्छुकांनी आपली सारी ङ्गइज्जतफ पणाला लावण्यासारखे आहे तरी काय या पालिकेत, असा प्रश्न कोणाही सामान्यांस पडू शकेल. सिंहस्थ जवळ आल्यामुळे त्यासाठी व्हावयाच्या हजारो कोटींची भुरळही अनेकांना पडलेली असू शकते. परिणामी, भाजपकडे व पाठोपाठ शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा वाढला. हा सारा स्वार्थाचा बाजार होता, आहे आणि राहील. मुळात, नाशिककर याकडे कसे पाहणार हा प्रश्न मोलाचा आहे.

ताज्या बातम्या

Malegaon MC Politics : महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-एमआयएमची उडी; नाट्यमयरित्या अर्ज...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी (Mayor and Deputy Mayor Election) काल (मंगळवारी) अंतिम मुदतीत शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी तर एमआयएम पक्षाने उपमहापौर...